अशोक तुपे

कापसाच्या वेचणीला प्रारंभ झाला असून अतिवृष्टीमुळे दर्जा खालावला आहे. कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाने खरेदी सुरू न केल्यामुळे बाजारात आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात कापूस विकला जात आहे. विशेष म्हणजे अन्य राज्यांपेक्षा कापसाला राज्यात नीचांकी दर मिळत आहे. कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून शुल्क व करवसुली करण्याचे काम समित्या करत आहेत.

यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील काही भागांत कापसाचे पीक वाया गेले आहे, तर कापसाची प्रत खालावली आहे. भिजलेला हा कापूस प्रतिक्विंटल ४ हजार ते ४६०० रुपये दराने कापूस विकला जात आहे. कपाशीला यंदाच्या हंगामात केंद्र सरकारने ५ हजार ८२५ रुपये इतका हमीभाव दिला आहे. पणन महासंघ आणि सीसीआयने कापूस खरेदी अद्याप सुरू केलेली नाही. मात्र सध्या पावसात भिजलेला ओला कापूस बाजारात विक्रीला येत आहे. त्यामुळे खरेदी लगेच सुरू करण्यात आलेली नाही. विजयादशमीनंतर खरेदी सुरू होणार आहे. तोपर्यंत चांगला कापूस बाजारात येण्यास प्रारंभ होईल. त्याकरिता आता कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नोंदणी सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाला सर्वात कमी दर देशात आहे. कापूस खरेदीला विलंब झाल्याने त्याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

राज्यातील जिनिंग मिल सध्या वेगवेगळ्या कारणांनी बंद आहेत. त्याचा फायदा गुजरातच्या व्यापाऱ्यांनी उठविला आहे. त्यांनी राज्यात कापूस उत्पादक पट्टय़ात दलालांच्या माध्यमातून खरेदी सुरू केली आहे. मात्र ते ४००० ते ४५०० रुपये दर देत आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत हा दर कमी आहे. गुजरातमधील विजयनगर, अमरेली, राजकोट, महुआ आदी ठिकाणी कापूस ४ हजार २०० ते ५ हजार १५० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकला जात आहे. कर्नाटकात बिजापूर, रायचूर येथेही साडेचार हजार ते पाच हजार दोनशे या दराने कापसाची विक्री सुरू आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश व पंजाबमध्येही साडेचार हजार ते पाच हजार रुपये दराने कापूस विकला जात आहे. राज्यांपेक्षा हा दर जास्त आहे. राज्यात कमी दरात खरेदी केलेल्या कापसाची सध्या गुजरातमध्ये विक्री केली जात आहे. या व्यवहारात मध्यस्थ या भावाच्या फरकाचा लाभ उठवीत आहेत.

कापसाची खरेदी सध्या शिवारात सुरू आहे; पण बाजार समित्यांनी खरेदी सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन कर व सेसवसुली सुरू केली आहे. क्विंटलमागे २५ रुपयांनी हा कर समित्या वसूल करत आहेत. पणन संचालकांनी यापूर्वी शिवारात खरेदी होणाऱ्या कापसावर कर आकारणी करू नये, असे पत्र दिले होते; पण आता कृषी विधेयकांची राज्यात अंमलबजावणी केली जाणार नाही, असे सरकारने जाहीर केल्यानंतर समित्यांनी गावोगावी जाऊन करवसुली सुरू केली आहे. हे करत असताना मात्र आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने कापूस विकत घेणाऱ्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही हे विशेष आहे. नगर जिल्ह्य़ात काही बाजार समित्या करवसुली करत नाहीत, तर काही करत आहेत. स्पष्ट धोरण नसल्याने गोंधळ आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगले दर आहेत. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आतापर्यंत सुमारे पन्नास लाख गाठी निर्यात केल्या आहेत. बांगलादेशला सुमारे १५ लाख गाठींची निर्यात करण्यात आली. यंदा ५० ते ६० लाख गाठी निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर निर्यातीवर परिणाम झाला होता; पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कापूस निर्यात सुरूच ठेवण्यात सीसीआयला यश आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निर्यात वाढणार आहे.

मागील वर्षी ३ कोटी ६० लाख गाठींचे उत्पादन झाले होते; पण देशांतर्गत वापर कमी झाला. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कापड उद्योगावर परिणाम झाला. त्यामुळे १ कोटी गाठी शिल्लक आहेत. यंदा ४ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे. राज्यात यंदा कापसाचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे.

कस्तुरी ब्रँड विकसित करणार

केंद्र सरकारने कापसाचा ब्रँड विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्रॅण्डचे नामकरण कस्तुरी असे करण्यात आले आहे. आतापर्यंत जागतिक बाजारपेठेत आपला कापसाचा ब्रँड नव्हता. ब्रँड विकसित केल्याने दर्जा आणि गुणवत्ता विकसित होईल. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात एक विश्वासार्हता निर्माण होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. कापसाच्या धाग्याची लांबी २९ मी.मी., ८ टक्क्यांपेक्षा कमी आद्र्रता व ३ टक्क्यांपेक्षा कमी काडी कचरा असावा, असे बंधन आहे. खान्देश जिनिंग मिल असोसिएशनने राज्याचा महाकॉट हा ब्रँड विकसित केला आहे. त्याचा दर्जा आणि गुणवत्तेचे नियम हे कस्तुरी या ब्रॅण्डकरिता लागू केलेले आहेत.

देशात व राज्यात कापसाचे अधिक उत्पादन होणार आहे. चार कोटी गाठींचे उत्पन्न अपेक्षित आहे. अद्याप राज्यातील जिनिंग मिल सुरू झालेल्या नाहीत; पण पंधरा दिवस ते एक महिन्यात त्या सुरू होतील. सध्या ओला कापूस बाजारात येत आहे. त्यामुळे त्याला दर कमी मिळतो, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची खरेदी सुरू झाल्यावर बाजारात कापसाचे दर वाढतील. त्यानंतर खुल्या बाजारातील कापसाचे दर वाढतील. असा अंदाज आहे.

– प्रदीप जैन, अध्यक्ष, खान्देश जिनिंग मिल असोसिएशन

राज्यात कापसाचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा हंगाम चांगला राहील, उत्पादन अधिक येणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगले दर आहेत; पण देशांतर्गत बाजारपेठेत दर कमी आहेत. यंदा कापसाची निर्यात चांगली झाली. आता या वर्षीदेखील चांगली निर्यात अपेक्षित आहे. देशाचा कापसाचा कस्तुरी हा ब्रॅण्ड विकसित केला जाणार आहे. त्यामुळे त्याचा दर्जा, गुणवत्ता वाढीस लागून मूल्यही वाढेल. कापसाची आयात कमी होईल व निर्यात वाढेल. सध्या हंगाम सुरू झाला आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया विजयादशमीनंतर राज्यात ८० ठिकाणी कापूस खरेदी सुरू करणार आहे.

– प्रदीपकुमार अग्रवाल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

Story img Loader