लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
अलिबाग : कोकण किनारपट्टीवर मॉन्सूचे आगमन झाले असले तरी अपेक्षित पावसाला सुरूवात झालेली नाही. कोकण विभागात यंदा जूनच्या सरासरीच्या तुलनेत ५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या तुलनेत रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे.
कोकणात जून महिन्यात सरासरी ३९७.५ मिलीमीटर पाऊस पडतो. त्यातुलनेत यंदा कोकण किनापट्टीवर २१९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण ५५ टक्के टक्के आहे. त्यामुळे राज्यातील इतर भागांच्या तुलनेत यंदा कोकणात पावसाने ओढ दिल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा-भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अजित पवारांवर चर्चा झाली का? बावनकुळे म्हणाले, “महायुतीतून…”
सिंधुदूर्ग जिल्ह्याचे जून महिन्याचे पर्जन्यमान सरासरी ५२८ मिलिमीटर आहे. त्यातुलनेत यंदा ३४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याची जून महिन्याची सरासरी ४८८ मिमी आहे. त्यातुलनेत यंदा ३१५ मिमी पाऊस पडला आहे. रायगड जिल्ह्यातील जून महिन्याची पावसाची सरासरी ३९३ मिंमी आहे. त्या तुलनेत यंदा १३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात सरासरी २७७ मिमी पाऊस पडतो, तिथे सरासरी ९१ मिमी पाऊस पडला आहे. पालघर जिल्ह्यात २४७ मिमी पाऊस पडतो तिथे १२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
आणखी वाचा-लोकसभेतील पराभवानंतर महायुतीचा मोठा निर्णय, राज्य सरकारच्या ‘या’ महत्त्वाच्या प्रकल्पाला स्थगिती!
यावरून कोकण विभागातील पाच जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याचे दिसून येत आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांच्या तुलनेत उत्तरेकडील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे या परिसरातील पाणी समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. मात्र कोकण किनारपट्टीवर आता मॉन्सुनसाठी पोषक स्थिती निर्माण होणार असून, या परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.