करोना लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. विरोधकांकडून या लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो छापण्याची काय गरज आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अनेक राज्यांनी तर त्यांच्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो हा त्या प्रमाणपत्रावर असावा अशी मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने यासंदर्भातील स्पष्टीकरणही दिलं आहे. पंतप्रधान मोदींचा फोटो आणि त्या सोबतचा संदेश हा या प्रमामाणपत्रावर छापण्यामागे जनजागृती करण्याचा हेतू असल्याचं सरकारने म्हटलं आहे.
त्यानंतरही लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांच्या फोटो असण्यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातही त्यावरुन टीका करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कन्या यांनी देखील याबाबत केंद्र सरकारला टोला लगावला आहे. आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे की गाडी चालवण्याच्या परवान्यावर तरी आपला फोटो आहे असे म्हणत दीक्षा नितीन राऊत यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.
“आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे की आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सवर स्वतःचाच फोटो आहे,” असे दीक्षा राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
We should consider ourselves lucky that our driving license has our own picture.
— Deeksha Nitin Raut (@DeekshaNRaut) August 11, 2021
केंद्र सरकारने लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील फोटोवरुन स्पष्टीकरणही दिल्यानंतरही दीक्षा राऊत यांनी आणखी एक ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “मास्क नसलेल्या माणसाचा फोटो शक्यतो कोविड १९ वर जागरूकता पसरवू शकत नाही!” अशी थेट टीका त्यांनी केली आहे.
Photo of a man without mask can’t possibly spread COVID-19 awareness!
— Deeksha Nitin Raut (@DeekshaNRaut) August 11, 2021
दीक्षा राऊत या अमेरिकेत व्यावसायिक उड्डाणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून काही वर्षापूर्वी नागपुरात परतल्या होत्या. त्यांचा धाकटा भाऊ कुणाल जे प्रशिक्षित व्यावसायिक पायलट आहेत ते त्याच्या वडिलांना त्याच्या राजकीय कारकिर्दीत मदत करत आहेत.