मोहनीराज लहाडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर : नगर जिल्हा राज्यात दूध उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्याचे दैनंदिन दूध संकलन आता ४१ लाख लिटरवर जाऊन पोहोचले आहे. दुधाला बाजारात बरा दर मिळू लागताच दुसरीकडे दुभत्या जनावरांच्या लंपी आजाराने जिल्ह्यातील शेतकरी धास्तावला आहे. लंपी आजाराचा जिल्हाभर प्रादुर्भाव पसरल्याचे आढळले आहे. नगर जिल्ह्याबरोबरच पुणे, जळगाव, अमरावती, नागपूर, धुळे या जिल्ह्यांतही प्रादुर्भाव आढळला आहे. 

केंद्र व राज्य सरकारने या आजारावरील नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तरीही प्रादुर्भाव वाढत चालल्याने त्याबाबत गांभीर्याने अंमलबजावणी होण्याच्या आवश्यकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दुभत्या गाई-म्हशींची संख्या १५ लाख ९९ हजार ६५८ आहे. त्यामध्ये म्हशींची संख्या २ लाख २१ हजारांवर आहे. पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात जनावरांची संख्या मोठी असलेले ५ लाख ३३ हजारांवर गोठे आहेत. अर्थात ही संख्या सन २०१९ मधील पशुगणनेची आहे. या संख्येत आता वाढ झाली आहे. परिणामी दूध व्यवसायावरील अवलंबितांची संख्याही वाढली आहे.

हेही वाचा >>> लम्पी त्वचा रोग.. : बळिराजावर नवे संकट – प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक

या संसर्गजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची सध्या मोठी धावपळ उडाली आहे. बैठकांचे सत्र, तपासणी मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. २ लाख २१ हजारांवर लसमात्रा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघात धूरीकरण, १० किमी परिसरात जनावरांची वाहतूक, जनावरांचा आठवडे बाजार प्रदर्शन शर्यती यांना मनाई करण्यात आली आहे. खाजगी पशुवैद्यकांचीही मदत घेतली जात आहे. यांची जिल्ह्यातील संख्या तीन हजारांवर आहे.

उपायोजना करूनही बाधित क्षेत्र, गोठे यांची संख्या रोज वाढू लागली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग, जिल्हा प्रशासनाची यंत्रणा यांनी कठोर पावले उचलणे गरजेचे झाले आहे. राज्यात काल, मंगळवापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या  २४ होती.

लंपी आजार संसर्गाची लक्षणे

दुभत्या जनावरांना ताप येणे, चारापाणी घेण्याचे प्रमाण कमी होणे, काही जनावरांमध्ये पायाला सूज येऊन लंगडतात, गळय़ाला सूज येणे, संसर्ग वाढल्यास तोंडातून, डोळय़ांतून स्राव गळणे. गाभण जनावरांचे गर्भपात होणे. संसर्ग अधिक वाढल्यास अंगावर गाठी येणे, त्यांच्या संख्येत, आकारात वाढ होणे, त्या फुटणे. जखमा होणे. तसेच घटसर्प, बबेशिया, थायलेशिया आदी आजार बळावणे. जखमांवर बसणाऱ्या माशांमुळे पुन्हा संसर्ग फैलावणे. केवळ डास माशा गोचीड यामुळे हा संसर्ग फायदा होत नाही तर माणसांच्या माध्यमातूनही गोठय़ांमध्ये शिरकाव करतो.

सरकारने लागू केलेल्या नियमांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. शेतकरीही जनावरांचे आजार लपवत आहेत त्यामुळे जनजागृती जास्त प्रमाणात होणे आवश्यक आहे पुढील महिन्यात साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होतील. त्यामुळे मोठय़ा संख्येने जनावरे कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील त्यापूर्वीच संसर्ग आटोक्यात आणणे आवश्यक आहे. राज्य सरकार व जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग खाजगी पशुवैद्यक दूध संघ यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. –राजेश परजणे, अध्यक्ष गोदावरी सहकारी दूध संघ.

नगर जिल्ह्यात ४० ठिकाणी संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे फॉगिंग, लसीकरण, गोठा स्वच्छता, तेथे हवा खेळती ठेवणे, मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून माहिती देणे, फलक लावणे, पत्रके वाटप करणे या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. खाजगी पशुवैद्यक संघटनेची प्रतिबंधक उपायांसाठी मदत घेतली जात आहे. आवश्यकतेनुसार जनावरांची वाहतूक बंद ठेवणे, बाधित क्षेत्रात बाजार, प्रदर्शन बंद ठेवणे अशा उपायोजना केल्या जात आहेत. -डॉ. सुनील तुंबारे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग.