सांगली : क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून तीन महिन्यात दामदुप्पट परतावा देतो असे सांगून सुमारे 61 लाख रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने संशयितांच्या घरी छापा टाकून एका अलिशान मोटारीसह काही रोकडही जप्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इचलकरंजी येथील सादिका कोचरगी यांनी या प्रकरणी त्यांच्यासह चौघांची फसवणूक झाल्याची फिर्याद मिरज शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीनुसार इब्राहिम महमंदसाब इनामदार व जास्मीन इनामदार या दांपत्यासह अब्दुल महमंदसाब इनामदार या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: “आम्ही भविष्य बघायला ज्योतिषाकडे जात नाही”, ‘त्या’ प्रश्नावरून अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला

तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांनी टोकेन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास तीन महिन्यात दुप्पट रक्कम देण्याचे आश्‍वासन व हमी दिली. यामुळे तक्रारदाराने घरात वापरात असलेले चार, मामा झाकीर हुसैन नगारजी यांच्या घरातील पाच आणि इचलकरंजीतील मित्र सैफुा शेख, साहिल मुजावर यांच्या वापरातील भ्रमणध्वनीवरून प्रत्येकी एक लाख असे बारा लाख रूपये क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतविले. याशिवाय नईम जंगले यांनीही १३ लाख बंदेनवाज यासीन मुजावर यांनी २२ लाख रूपये या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवले. अशी एकूण ६१ लाख रूपयांची गुंतवणूक करून वेळोवेळी मागणी करूनही मुद्दल व परतावा मिळाला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत गुन्हा दाखल होताच, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांच्या घरी छापा टाकून अलिशान मोटार, अत्याधुनिक दोन दुचाकी व सुमारे दोन लाखाची रोकड जप्त केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lure of double returns from crypto currency 61 lakh fraud in miraj sangli tmb 01