* मनोरुग्ण नसल्याचा न्यायालयाचा निर्वाळा
* सोमवारी शिक्षा सुनावणार
स्वारगेट एसटी स्थानकातून बस चोरून नऊ जणांना उडवून त्यांचा जीव घेणारा एसटी चालक संतोष माने याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. मात्र, माने हा मनोरुग्ण नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे. त्याला सोमवारी ८ एप्रिलला शिक्षा सुनावली जाणार आहे.
माने याने २५ जानेवारी २०१२ रोजी स्वारगेट एसटी बस स्थानकातून बस पळवून नेत भरधाव वेगाने हाकली होती. त्यात त्याने ३५पेक्षा अधिक वाहनांना धडक दिली. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ३७जण जखमी झाले होते. माने हा मनोरुग्ण असून त्याने हे वेडाच्या भरात कृत्य केल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला होता. वेडेपणात एखादा गुन्हा केला तर त्या व्यक्तीला कलम ८४ नुसार शिक्षा होत नाही. या कलमाचा फायदा मानेला द्यावा, अशी मागणी बचाव पक्षाने केली होती. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. घटनेच्या अगोदर २३ व २४ जानेवारी २०१२ रोजी माने याची मानसिक स्थिती ठीक होती. बचाव पक्ष माने हा वेडा असल्याचा एकही पुरावा सादर करू शकलेला नाही. त्यामुळे माने याला खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली दोषी ठरविण्यात येत असल्याचे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे.
निष्पाप व्यक्तींचा तो अखेरचा दिवस
घटनाक्रम-
स्वारगेट बस स्थानकावर २५ जानेवारी २०१२ रोजी नेहमीप्रमाणे गर्दी होती. फलाटावर सकाळी साडेआठच्या सुमारास पुणे-सातारा-पुणे ही बस लागली होती. इतक्यात संतोष मारुती माने याने बसमध्ये चढून आपल्याकडील मास्टर कीने बस चालू केली. हडपसर रस्त्याच्या बाजूने असलेल्या गेटमधून बाहेर काढत गोळीबार मैदान रस्त्याच्या विरुद्ध दिशेने घेऊन गेला. त्याने बेदरकारपणे बस पळवत रस्त्यावरील ४५ पेक्षा जास्त वाहनांना उडवत नऊजणांचा बळी घेतला होता. ३७ जण या घटनेत जखमी झाले होते. यापैकी अनेक जण कामाला, कॉलेजला जात होते. तसेच रस्त्यावरील पादचाऱ्यांचा जखमी व मृत्यूमध्ये समावेश होता. माने घेऊन जात असलेल्या बसला पोलिसांनी-नागरिकांनी अडविण्याचा प्रयत्न केला. लष्कर भागात बीट मार्शलनी बसच्या चाकावर गोळीबार केला. पण मानेला अडविण्यात यश आले नाही. माने पूलगेट येथून लष्कर भागात गेला तेथून आतमध्ये फिरून कासेवाडी मार्गाने सेव्हन लव्हज चौकातून सरळ जात मुकुंदनगर येथील रस्त्याने लक्ष्मीनारायण चौकात आला. या चौकात पोलिसांनी पीएमटी बस आडवी लावून त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मित्रमंडळ चौकातून सारसबाग चौकात सिंहगड रस्त्याला तो लागला. सिंहगड रस्त्यावर डिव्हायडर तोडून बस पुन्हा विरुद्ध दिशेला नेताना रिक्षाला मोटारीला उडविल्यामुळे बस थांबली. त्यावेळी एका तरुणाने मध्ये शिरून मानेला बाहेर खेचले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
घटनेत मरण पावलेल्या व्यक्ती- पूजा भाऊराव पाटील (वय १९, रा. ससाणेनगर), राम ललीत शुक्ला (वय २५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), शुभांगी सूर्यकांत मोरे (रा. शुक्रवार पेठ), पिंकेश खांडेलवार (वय २८, रा. महर्षीनगर), अंकुश तिकोणे (वय ४६), अक्षय प्रमोद पिसे (वय २०, रा. लॉ कॉलेज रोड), मिलिंद पुरुषोत्तम गायकवाड (वय ४६, आनंदनगर, सिंहगड रस्ता), श्वेता धवल ओसवाल (वय २८, रा. टिंबर मार्केट) व चांगदेव भांडवलकर (वय ५५). हे सर्व मृत पुण्यातील होते
माथेफिरू माने दोषी
स्वारगेट एसटी स्थानकातून बस चोरून नऊ जणांना उडवून त्यांचा जीव घेणारा एसटी चालक संतोष माने याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. मात्र, माने हा मनोरुग्ण नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे. त्याला सोमवारी ८ एप्रिलला शिक्षा सुनावली जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-04-2013 at 04:18 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mad man laxman mane is accused