सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुनःश्च उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपमध्ये मोहिते-पाटील गट प्रचंड अस्वस्थ झाला असताना दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटात त्याचे पडसाद उमटले आहेत. माढा विभाग शिवसेना संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी पक्षाचा राजीनामा देत रणजितसिंह निंबाळकर यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
कोकाटे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी पक्षाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना कोकाटे यांनी, आपले पारंपरिक विरोधक तथा माढ्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे मदत करतात. आमदार शिंदे यांना जो कोणी मदत करेल, त्या कोणत्याही व्यक्तीला आणि त्यांच्या पक्षाला आपण पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आमदार शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली.
हेही वाचा – अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचा आज शरद पवार गटात प्रवेश होणार!
हेही वाचा – बारामती : कन्हेरीच्या मारुती दर्शनाने शिवतारे यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा
राज्यात आरक्षणाच्या मुद्यावर सत्ताधारी भाजप मराठा आणि धनगर समाजात भांडण लावून आपली पोळी भाजून घेतल्याचा आरोपही कोकाटे यांनी केला. विजय साखर कारखान्याच्या विक्री प्रकरणात खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आमदार शिंदे यांचे हित पाहिले आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे देणे आणि शेअर्सची रकमांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली. हेच नेते मला आणि नागनाथ कदम यांना आमदार बबनराव शिंदे व त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या विरोधात केंद्रीय सक्तवसुली संचलनालयाकडे (ईडी) तक्रार करायला लावले होते. परंतु दुसरीकडे ते स्वतः टेंभुर्णीत शिंदे कुटुंबीयांच्या शेतघरात जाऊन पाहुणचार घेऊन तडजोडी करीत होते, असा गौप्यस्फोटही कोकाटे यांनी केला.