सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या माढा तालुक्यात आमदार बबनराव शिंदे यांच्यासह पक्षाच्या सर्वच्या सर्व पदाधिकारी पक्षातील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. त्यामुळे शत प्रतिशत राष्ट्रवादी अशी ख्याती राहिलेल्या माढा तालुक्यात शरद पवार गटाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा शेजारच्या करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी शरद पवार यांच्याकडे पाठ फिरवून अजित पवार गटात जाणे पसंत केले आहे. वर्षानुवर्षे शरद पवार यांना मानणा-या माढा तालुक्यात आमदार बबनराव शिंदे हे १९९५ पासून सलग सहाव्यांदा विधानसभेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. तालुक्यात एखाद दुसरा अपवाद वगळता बहुसंख्य स्थनिक स्वराज्य संस्थांसह साखर कारखाने, बँका, दुध संस्थांवर राष्ट्रवादी नेत्यांचा वरचष्मा राहिला आहे.

हेही वाचा >>> काँग्रेस फुटणार नाही पण,भाजपकडून अफवांचे काम – पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन

एकेकाळी दुष्काळाचा शाप मिळालेल्या माढा भागात तत्कालीन युती सरकारच्या काळापासून गेल्या २५ वर्षात सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे ऊस उत्पादनामुळे माढा तालुका साखर पट्टा म्हणून ओळखला जातो.

सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाला शह देण्यासाठी शरद पवार व अजित पवार दोन्ही काका-पुतण्यांनी माढ्याच्या शिंदे बंधुंना मोठी ताकद दिली आहे. विजयसिंह मोहिते-पाटील हे  राष्ट्रवादीत असताना २००९ साली शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. या पार्श्वभूमीवर माढा तालुका राष्ट्रवादीचा अभेद्य गड ठरला असतानाच मागील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोदी लाटेचा वाढत्या प्रभावामुळे राष्ट्रवादीचा टिकाव लागणार नाही, याची चाहूल लागल्यामुळे पक्षातून बहुसंख्य बडी नेते मंडळी शरद पवार यांची साथ सोडली होती.

हेही वाचा >>> “तुमची असेल-नसेल ती सगळी ताकद लावा अन्…”, पंतप्रधान मोदींना शरद पवारांचं जाहीर आव्हान

त्यावेळी पराभवाच्या भीतीमुळे बबनराव शिंदे व संजय शिंदे हे सुध्दा शरद पवार यांच्यापासून दूर गेले होते. परंतु शेवटच्या क्षणी ते पुन्हा पवार यांच्याकडे परत फिरले होते. मागील पाच वर्षातही आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात ईडी व अन्य तपास यंत्रणांचा ससेमिरा लागल्यामुळे त्यांची घालमेल सुरू होती. शेवटी राष्ट्रवादीत मोठी फूट पडून अजित पवार हे महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आमदार शिंदे बंधुंसह माढा तालुक्यातील पक्षाचे सर्वच्या सर्व पदाधिकारी अजित पवार गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे शरद पवार गटाचे या तालुक्यातील अस्तित्व संपुष्टात आले आहे. प्राप्त परिस्थितीत शरद पवार यांना आपल्या पक्षाची नव्याने बांधणी करताना नव्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागणार असल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जाते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madha mla babanrao shinde joined deputy chief minister ajit pawars group after ncp split zws
Show comments