डॉ. माधव गाडगीळ समितीने आपल्या अहवालात केलेल्या शिफारशी जिल्ह्य़ासह कोकणच्या विकासाला मारक ठरणाऱ्या असल्याने त्यांचा विचारच करू नये, असा एकमुखी ठराव जिल्हा नियोजन समितीने केला असल्याची माहिती पालकमंत्री भास्करराव जाधव यांनी दिली. दरम्यान जिल्ह्य़ात चिपळूण येथे होत असलेले साहित्य संमेलन साहित्यिकांच्या दृष्टीने भूषणावह असून, त्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; तर जिल्ह्य़ाच्या विकासासाठी गतवर्षीच्या आराखडय़ापैकी ९७ कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील खाण उद्योग-व्यवसायासह काळा दगड, वाळू, आणि वृक्षतोडीवर या अहवालातील शिफारशींमुळे बंदी आली आहे. यामुळे बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. या पाश्र्वभूमीवर हा अहवाल कोकणाच्या हिताचा नाही, असा सूर उमटला व सर्वानीच या अहवालाला कडाडून विरोध केला. त्यामुळे अहवालात केलेल्या शिफारशींचा फेरविचार न करता तो फेटाळावा, अशी जोरदार मागणी केली. अखेर सदस्यांच्या तीव्र भावनांचा आदर करत डॉ. गाडगीळ समितीचा अहवाल फेटाळण्यात येत असल्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात झालेल्या स्त्री-भ्रूण हत्येच्या प्रकाराने जिल्ह्य़ाला काळिमा फासली आहे. अशा या संतापजन गुन्ह्य़ातील आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी सक्षम पुरावे तयार करावेत, अशा सूचना पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहेत. तसेच खेड, गुहागर व संगमेश्वर येथे झालेल्या तणावग्रस्त वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर यापुढे जिल्ह्य़ातील शांतता व सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी पोलीस यंत्रणेने विशेष दक्षता घ्यावी, अशी सूचनाही देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाविषयी खंतही पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
साहित्य संमेलनासाठी २५ लाख
चिपळूण येथे होणाऱ्या ८६ व्या साहित्य संमेलनासाठी २५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. संमेलन जनतेच्या दृष्टीने अत्यंत भूषणावह असून ते यशस्वी होण्यासाठी सर्वानीच हातभार लावण्याची आवश्यकता आहे. जिल्हा नियोजन समितीनेही या संमेलनासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे, असे जाधव सांगितले.