शहराजवळील बोरी धरणातून लघु पाटबंधारे विभागाने शेतीसाठी कालव्यात पाणी सोडले. परंतु कालव्यास अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गळती लागली असून, कालव्यातून झिरपणारे पाणी बोरी नदीत शिरल्याने नदीही तुडुंब भरली आहे. या बरोबरच नदीच्या पाण्यावर अवलंबून ऐतिहासिक किल्ल्यातील ‘मादी’ धबधबाही अवेळी वाहू लागला आहे. भर उन्हाळ्यात धबधब्यातून पाणी वाहण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बोरी धरणातील पाणी गेल्या काही महिन्यांपासून पाटबंधारे विभागाने शेतीसाठी कालव्यात सोडले आहे. विभागाने अजूनही पाणी सोडणे थांबविले नाही. धरणातून दररोज १ हजार १७२ दशलक्ष घनमीटर पाणी कालव्यात सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी झपाटय़ाने खालावली जात आहे. विशेष म्हणजे कालव्यास अनेक ठिकाणी मोठी गळती लागली आहे. त्यामुळे कालव्यात सोडलेल्या पाण्यापकी अध्र्यावर पाण्याची चक्क नासाडीच होत आहे.
कालवा दुरुस्तीवर पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु आजपर्यंत कालव्याची गळती कधीच थांबू शकली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडून कालवा दुरुस्तीवर केलेल्या संपूर्ण खर्चाची चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरीत आहे.
कालव्यास ठिकठिकाणी लागलेल्या गळतीमुळे झिरपणारे पाणी थेट बोरी नदीपात्रात शिरले असून, भर उन्हाळ्यात नदी तुडुंब भरल्याचे चित्र आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यावर सुरू होणाऱ्या नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधब्यापकी मादी धबधब्यातून सध्या पाणी वाहत आहे. कडक उन्हाळ्यात धबधबा वाहण्याची ही पहिलीच वेळ आहे. धरणातून कालव्यात सोडलेले पाणी तत्काळ बंद करावे, अशी मागणी मनसे व शिवसेनेच्या वतीने पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. परंतु विभागाने मागणीकडे दुर्लक्ष केले.