रेल्वे अर्थसंकल्पात दररोजचे एक कोटी प्रवासी असलेल्या मुंबईला डावलल्याने कमालीची नाराजी व्यक्त करताना, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र शासनाच्या या भूमिकेचा निषेध केला आहे.
महाराष्ट्राच्या राजधानीला काहीच दिले नसल्याचे सांगत, एकूणच रेल्वे अर्थसंकल्पावर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, की आपण रेल्वेअर्थसंकल्पाचा निषेध करीत आहोत. रेल्वे प्रवासाची भाडेवाढ का अन् कशासाठी केली गेली. बुलेट ट्रेनचा गवगवा सुरू आहे. परंतु त्यासाठी किती खर्च लागतो आणि या प्रकल्पासाठी जागा कोठून आणणार असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. १४ टक्क्यांवर केलेल्या भरमसाठ भाडेवाढीसंदर्भात जनतेत व विशेषत: रेल्वे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, संबंधितांनी यावर सविस्तर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. भाडेवाढ केली नसती तर दोन महिन्यांत रेल्वे बंद करावी लागली असती, या वक्तव्याचे स्पष्टीकरणही मिळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
आघाडी शासनातील काँग्रेसचे सहकारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने १४४ नाहीतर २८८ असा विधानसभेच्या पाश्र्वभूमीवर निर्वाणीचा इशारा दिला असल्याचे निदर्शनास आणून दिले असता, मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात चर्चेअंती बोलणे उचित असल्याचे नमूद करून जागा मागणीचा प्रकार म्हणजे जागा वाढवून मिळण्यासाठी वातावरण निर्मितीचा प्रकार असल्याची खिल्ली उडवली. लोकसभा निवडणुकीत प्रसिद्धीत कमी पडल्याने पराभव झाल्याचे म्हणता येणार नसल्याचे मत व्यक्त त्यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीतही विकासाच्या मुद्यावरच सामोरे जाणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, महाराष्ट्राने गेल्या १५ वर्षांत सर्वागाने प्रगती साधली असून, हे देशातील आघाडीचे राज्य आहे. गुजरातपेक्षाही महाराष्ट्र शासनाची कामगिरी निश्चितच उठावदार असल्याचा दावा करताना, राज्याला आणखी प्रगतिपथावर न्यायचे आहे. सर्वच क्षेत्रात उत्तुंग विकास साधावयाचा असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरातील विकासाचे आव्हान आम्ही पेलले आहे. सध्या मुंबईत १५ हजार कोटींची कामे सुरू असून, ३६ हजार कोटींची कामे प्रस्तावित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेतमालाला गोडावून उपलब्ध करून देण्यासंदर्भात ठोस पावले उचलली जातील, असे त्यांनी नमूद केले. मुंबई बाजार समिती बरखास्तीसंदर्भात चौकशी सुरू असल्याचे सांगताना, मुख्यमंत्र्यांनी अधिक बोलणे टाळले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा