विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना राज्य सरकारवर, विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. विरोधी पक्षांवर हल्ला चढवण्यासाठी राज्य सरकारकडून षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. यासाठी आपल्याकडे तब्बल १२५ तासांचं व्हिडीओ फूटेज असल्याचा दावा देखील फडणवीसांनी केला असून त्यातल्या काही व्हिडीओमधले खळबळजनक संवाद त्यांनी यावेळी सभागृहात वाचून दाखवले. दरम्यान, फडणवीसांच्या या आरोपांवर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आजच उत्तर देणार होतो, पण..”

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आपण सज्ज असल्याचं गृहमंत्र्यांनी सुनावलं आहे. “काल सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेनुसार मी आज सभागृहात चर्चेचं उत्तर देणार होतो. त्यासाठी पूर्णपणे तयार होतो. पण विरोधी पक्षनेत्यांनी विनंती केली की आजऐवजी उद्या ते उत्तर द्यावं. त्यामुळे त्यांच्या आरोपांना उद्या उत्तर देणार आहे”, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.

“चाकू प्लांट करण्यापासून ते गळ्याला…”; गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारने षडयंत्र रचल्याचा फडणवीसांचा आरोप

उद्या काय होणार?

दरम्यान, आता राज्याच्या गृहमंत्र्यांनीच विरोधी पक्षनेत्यांना आव्हान दिल्यामुळे उद्या अर्थात गुरुवारी नेमकं सभागृहात काय होणार? यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यासंदर्भात दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या सूचक विधानामुळे उत्कंठा ताणली गेली आहे. “मी यानिमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की जे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत, त्या सर्वांची माहिती घेऊन उद्याच्या माझ्या उत्तरानंतर दूध का दूध आणि पानी का पानी हो जाएगा”, असं वळसे पाटील म्हणाले आहेत.

संजय पांडे कोणत्या बोलीवर मुंबई पोलीस आयुक्त झाले? देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट! व्हिडीओ क्लिपच्या आधारे केला गंभीर आरोप!

काय म्हणाले होते फडणवीस?

“विरोधकांची कत्तल कशी करायची यासाठी षडयंत्र शिजत होते. या कथेमध्ये प्रमुख पात्र विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण हे होते. सुरेशदादा जैन, रमेश कदम, डीएसके, महेश मोतेवार, रवींद्र बराटे या प्रकरणात त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. गिरीश महाजन यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्या प्रकरणातही सरकारी वकील हेच आहेत. या वकिलांचे कार्यालय आहे की, महाविकास आघाडी सरकारचा राजकीय कत्तलखाना अशी स्थिती आहे. चाकू प्लांट करण्यापासून ते गळ्याला रक्त लावण्यापासून ते ड्रग्जचा धंदा कसा दाखवायचा, रेड कशी टाकायची आणि कसेही करुन ही केस मोक्कामध्ये कशी फिट बसेल याचे नियोजन, गुन्हेगारी स्वरुपाचा कट एक सरकारी वकील करतो याची ही निर्लज्ज कथा आहे. या सरकारी कत्तलखान्याच्या नायकाची कथा आहे”, असा आरोप मंगळवारी फडणवीसांनी सभागृहात केला होता.