गेल्या काही दिवसांपासून देशभरात हिजाब प्रकरणावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्नाटकच्या उडुपीमध्ये एका महाविद्यालयाने हिजाब घातलेल्या मुस्लीम मुलींना प्रवेश नाकारल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला आहे. मात्र, त्याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले असून राजकीय पक्षांनी देखील यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. हिजाब प्रकरणावरून आज आंदोलन होण्याची परिस्थिती पाहाता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्रातील नागरिक आणि राजकीय पक्षांना देखील तंबी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परराज्यातला मुद्दा आणि राज्यातली शांतता

दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी हिजाब मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. “परराज्यातल्या एखाद्या मुद्द्यावर आपल्या राज्यातली शांतता बिघडवू नका”, असं आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केलं. “जातीजातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये आपण अनावश्यक संघर्ष करायला लागलो, तर समाजात एक दुही तयार होते. त्यामुळे हे आंदोलन शक्यतो करू नये. माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावं”, असं वळसे पाटील म्हणाले.

राजकीय पक्षांना तंबी

दरम्यान, यावेळी बोलताना गृहमंत्र्यांनी सामान्य नागरिकांसोबतच या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना देखील तंबी दिली. “जे मी सामान्य नागरिकांना सांगितलं तेच राजकीय पक्षांनाही सांगतो आहे. त्यांनी विनाकारण राज्यात या विषयावरून अस्वस्थता निर्माण करू नये आणि पोलीस विभागाचं काम वाढवू नये”, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Hijab Row : “या सगळ्या समस्यांवर एकमेव तोडगा म्हणजे…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट व्हायरल!

धर्मगुरुंना सूचना

“माझी धर्मगुरूंना प्रार्थना राहील की आवाहन करताना आपण कुणालाही प्रक्षुब्ध करणारं किंवा रोष वाढवणारं वक्तव्य करू नये. तुमचे जे हक्क आहेत ते आहेतच. पण विनाकारण या गोष्टीचं भांडवल करू नये”, असं वळसे पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mah home minister dilip walse patil warns political parties on hijab row pmw