महाराष्ट्रामधील औरंगाबाद जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. या ठिकाणी बँकेचे अधिकारी आता एका शेतकऱ्याकडे १५ लाख परत करण्याची मागणी करत असून आपण चुकून या शेतकऱ्याच्या खात्यावर १५ लाख पाठवल्याचं बँक अधिकाऱ्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी आलेला हा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवल्याचं समजून या शेतकऱ्याने तो वापरल्याची माहिती समोर आलीय.
औरंगाबादमधील पैठणमधील शेतकरी ज्ञानेश्वर ओटे यांच्या खात्यावर ऑगस्ट २०२१ मध्ये १५ लाख रुपये जमा झाले. जनधन खात्यावर हे पैसे जमा झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या कालावधीमध्ये दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचं ज्ञानेश्वर यांना वाटलं. त्यांनी हे पैसे खात्यात आल्यानंतर पीएमओ म्हणजेच पंतप्रधान कार्यालयाला धन्यवाद म्हणणारं पत्र सुद्धा पाठवलं होतं.
त्यानंतर ज्ञानेश्वर यांनी बँक ऑफ बडोदामधील खात्यावरुन नऊ लाख रुपये काढले. या पैशांमधून त्यांनी घर बांधलं. मात्र आता बँकेने ज्ञानेश्वर यांना नोटीस पाठवली असून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चुकून तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले होते. त्यामुळेच आता तुम्ही हे पैसे बँकेला परत करावेत असं या नोटीसमध्ये म्हटलं होतं.
मात्र नंतर हा पैसा पिपळवंडी ग्राम पंचायतीमधील विकासकामांसाठी पावणं अपेक्षित असून तो चुकून ज्ञानेश्वर यांच्या खात्यावर पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली. चार महिन्यांनंतर ग्रामपंचायतीला विकासकामांसाठीचा पैसा हा ज्ञानेश्वर यांच्या खात्यावर जमा झाल्याचं समजलं आणि त्यांनी यासंदर्भात बँकेकडे रितरस तक्रार केली. त्यानंतर बँकेतील अधिकाऱ्यांना सर्व प्रकार लक्षात आल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.
यासंदर्भात बोलताना ज्ञानेश्वर यांनी आपल्याला हे पैसे पंतप्रधान मोदींनी पाठवल्याचं वाटल्याने आपण ते खर्च केल्याचं सांगितलं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधानांनी सर्व काळा पैसा देशात परत आल्यास प्रत्येक भारतीयाच्या वाट्याला १५ लाख रुपये येतील इतका पैसा परदेशात आहे, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. तेच आश्वासन पंतप्रधानांनी पूर्ण केल्याचं ज्ञानेश्वर यांना वाटलं. मात्र बँकेने हे चुकून झाल्याचं सांगितल्यानंतर या पैशांपैकी सहा लाख रुपये ज्ञानेश्वर यांनी बँकेला परत केलेत. मात्र त्यांनी याच पैशांमधून नऊ लाख खर्च करुन घर बांधलं आहे. आता हे नऊ लाख रुपये त्यांना बँकेला परत करावे लागणार आहेत.