अजित पवार यांच्यासह आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला जुलै महिन्यात पाठिंबा दर्शवला आहे. तेव्हापासून आमदार रोहित पवार शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारवर आक्रमक होत टीका करताना दिसतात. अशातच आता रोहित पवार यांच्या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई झाल्याचं समोर आलं आहे. दोन राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून मनात कुठला तरी द्वेष ठेवून कंपनीच्या एक विभागावर कारवाई करण्यात आली, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर रोहित पवार म्हणाले, “राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो.””मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. परंतु, अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “हा एवढा माज कोठून आला? याचं…”, मुलुंडमध्ये महिलेला घर नाकारल्यानंतर राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

“द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही”

“हा लढा मी लढणारच आहे. पण, ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे, त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो. परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही,” असं रोहित पवार म्हणाले.

“माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार”

“आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो. परंतु, राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे,” असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : “महाराष्ट्रीयन अलाऊड नाही” म्हणणाऱ्या बाप-लेकानं मराठी महिलेची मागितली माफी; नेमकं घडलं काय होतं? पाहा Video!

“शासकीय अधिकाऱ्यांना कुठलाही दोष देत नाही”

“असो! पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील,” असेही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha govt action against rohit pawar company allegation 2 leader shinde fadnavis ajit pawar govt ssa
Show comments