महाविकासआघाडी ही आघाडी नसून सर्वात मोठी बिघाडी आहे. करोनाने स्थिती बिघडली आहे. मात्र महाविकासआघाडी सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अधिक बिघडविली आहे. असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज(शनिवार) केला.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपा-रिपाइं मित्रपक्षांच्या युतीचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी रामदास आठवले यांनी आज मंगळवेढा आणि पंढरपूर मतदारसंघाचा दौरा केला. या प्रचार दौऱ्यात त्यांनी आपल्या खास शैलीतील महाविकास आघाडीवर टीका केली. तर उमेदवार समाधान अवताडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

मुंबईतून सकाळी हेलिकॉप्टरने इंदापूर येथे त्यांचे आगमन होताच. माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आठवले यांचे चिरंजीव कुमारजित आठवले यांचाही सत्कार करण्यात आला. त्यानंतर मंगळवेढा आणि पंढरपूर येथे दोन जाहीर प्रचार सभांना आठवले यांनी संबोधित केले.

“आम्ही पेरत नाही बातमी खोटी.. तेच म्हणालेत शंभर कोटी” –
“शंभर कोटी मागण्याची केली ज्यांनी चूक ते मंत्रीपदाला मुकले अनिल देशमुख..” अशी कविता करून रामदास आठवलेंनी राज्य सरकारसह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला. तसेच, महाविकासआघाडीचे सरकार बदनाम झाले आहे. कोरोनाची महामारी ते रोखू शकले नाही. त्यांच्यात अंतर्गत बिघाडी आहे. असं देखील यावेळी आठवले म्हणाले.

याचबरोबर, “संपूर्ण देशात राज्याची बदनामी नाचक्की करण्याचे काम महाविकासआघाडी सरकारने केले आहे. महाविकासआघाडी सरकार बदनाम झाले असल्याने त्यांच्या उमेदवारास जनता मतदान करणार नाही.”, असा दावा आठवले यांनी यावेळी केला.

यावेळी उमेदवार समाधान अवताडे, कुमार जित आठवले, माजीमंत्री अनिल बोंडे, खासदार निंबाळकर, श्रीकांत देशमुख, सुधाकर भालेराव, रिपाइंचे सुनील सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, अप्पा जाधव, संतोष पवार, किर्तीपाल सर्वगोड, आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader