MVA Joint Press Conference: येत्या दोन-तीन दिवसांत विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर केल्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील तीनही घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आणि महायुतीच्या धोरणावर जोरदार टीका केली. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या जाहिरांतीवर जोरदार टीका केली. राज्यात एकाबाजूला सामान्य माणूस विविध अडचणींचा सामना करत असताना सरकारकडून सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांना घेऊन मोठ मोठ्या जाहिराती केल्या जात आहेत. पण कितीही जाहिराती केल्या तरी सरकारचा खरा चेहरा लपला जाणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दारांना सुरक्षा कशासाठी?
“पोलिसांचा वापर गद्दारांच्या सुरक्षेसाठी केला जात आहे. सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी किती पोलीस आहेत आणि गद्दारांच्या सुरक्षेसाठी किती पोलीस आहेत? याची माहिती आरटीआयमधून बाहेर काढली पाहीजे. त्यामुळेच मी उपरोधिकपणे म्हणतो की, सत्ताधाऱ्यांच्या घरात धुणी-भांडी करणाऱ्यांनाही सुरक्षा पुरविली गेली आहे. काही महिन्यांपूर्वी आमचा युवा नेता अभिषेक घोसाळकरची हत्या झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितल्यानंतर त्यांनी म्हटले की, गाडीखाली कुत्र्याचे पिल्लू आल्यानंतरही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणार का? याचा अर्थ गृहमंत्र्यांना राज्यातील सामान्य जनतेची काही पडलेली नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “महाराष्ट्र ही मोदी-शाहांच्या गुलामांची वसाहत झालेली आहे. अशापद्धतीने सरकार चालवले जात आहे. हे सरकार आता घालवावेच लागेल. काल बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. संपूर्ण देशात मुंबई असे एकमेव शहर असेल जिथे दोन पोलीस आयुक्त आहे. आणखी पाच वाढवा, काही हरकत नाही. तुमचे जे जे लाडके अधिकारी आहेत, त्यांना आयुक्त करा. पण कारभार सुधारा. महिला, राजकारणी, सत्ताधारी पक्षातील नेते असुरक्षित आहेत. मग सामान्य जनतेचे काय होणार?”
हे ही वाचा >> “ना युती, ना आघाडी… स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार अन्…”, राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला
मुख्यमंत्री कोण होणार? ही चर्चा संपवली
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अशी मागणी उद्धव ठाकरे सातत्याने करत होते. मात्र हरियाणा विधानसभेच्या निकालानंतर आता मविआने सावध पवित्रा घेतला असून मुख्यमंत्री पदावर बोलणे टाळले आहे. आधी महायुतीने मुख्यंमत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, ते गद्दारंच्या नेतृत्वात निवडणुका लढविणार का? हे जाहीर करावे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद महत्त्वाचे नाही, तर राज्याच्या जनतेचे हित महत्त्वाचे आहे, अशी भूमिका शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी व्यक्त केली.