सांगली : सांगली बाजार समितीसाठी महाविकास आघाडी विरूध्द भाजप असा सामना होत असून तशी घोषणा आज दोन्ही पॅनेलच्यावतीने करण्यात आली. मात्र, महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाची फसवणूक केली असून याच्या निषेधार्थ शिवसेना सर्व उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी केली.
सांगली बाजार समिती मिरज, कवठेमहांकाळ व जत या तीन तालुक्याची असून या आर्थिकदृष्ट्या सक्षम बाजार समिती असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बाजार समितीची निवडणुक अविरोध करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत खलबते झाली, मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर महाविकास आघाडी विरूध्द भाजप असा सामना होत आहे. संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी लढत होत असून व्यापारी गटाच्या दोन आणि हमाल गटाच्या एक जागा वगळता उर्वरित १५ जागासाठी भाजप विरूध्द महाविकास आघाडी असा सामना होत आहे.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सात, राष्ट्रवादीला सहा तर शिवसेनेला दोन जागा असा समझोता झाला असून या निवडणुका वसंतदादा शेतकरी पॅनेल या नावाने लढविल्या जाणार असल्याचे पॅनेलचे निमंत्रक आ. विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक मनोज शिंदे, बाळासाहेब व्हनमोरे आदी उपस्थित होते. जागा वाटपामध्ये जतला काँग्रेसने झुकते माप दिले असून चार जागा जतसाठी तर तीन जागा मिरज तालुक्यासाठी दिल्या आहेत. कवठेमहांकाळमधील घोरपडे गटाला दोन जागा दिल्या आहेत.
हेही वाचा >>> कोल्हापुरात तरुणाचा निर्घृण खून
दरम्यान, निवडणुक अविरोध करण्यासाठी भाजपबरोबर सुरू असलेली बोलणी अखेरच्या टप्प्यात निष्फळ ठरली. समाधानकारक जागा न दिल्याने अविरोध निवडीची चर्चा असफल ठरल्याने भाजपने पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली समविचारी लोकांना एकत्र घेउन स्वतंत्र पॅनेल मैदानात उतरविण्याचे ठरविले असल्याचे माजी आ. विलासराव जगताप यांनी सांगितले. यावेळी आ . गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, अनुसूचित जाती सेलचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने चर्चेत गुंतवून आमची फसवणूक केली असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेना म्हणजे अजितराव घोरपडे असा समज करून आमची फसवणूक केली असून तमाम शिवसेनेचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ सर्व बाजार समिती निवडणुकीतून ठाकरे गटाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या नेत्याचे अथवा पक्षाचे नाव वापरू नये, अन्यथा याचे परिणाम काँग्रेस-राष्ट्रवादीला भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी बजरंग पाटील, दिगंबर जाधव आदी उपस्थित होते. दरम्यान, आटपाडी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दुरूंगी लढत असून एका पॅनेलमध्ये भाजप आणि काँग्रेस असून दुसर्या पॅनेलमध्ये शिवसेना शिंदे गट, रासप आणि राष्ट्रवादी आहे.