वाई : यंदाच्या राज्यातील बिघडलेल्या हवामानाचा फटका उन्हाळी हंगामासाठी प्रसिद्ध असलेले थंड हवेचे पर्यटनस्थळ महाबळेश्वरलाही बसला आहे. दिवसभर कडाक्याचे उन, असह्य उकाडा आणि संध्याकाळी रोज कोसळणारा पाऊस यामुळे आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरच्या पर्यटनाची घडीच यंदा विस्कटली आहे. यामुळे यंदा इथे उन्हाळी हंगामात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत तब्बल ३० टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम वाई, पाचगणी, महाबळेश्वरच्या अर्थव्यवस्थेवरही झाला आहे.

महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटन स्थळाची ओळख थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून सर्वत्र आहे. साधारण मार्च महिना उलटला आणि परीक्षा संपून सुट्ट्या लागल्या, की उन्हापासून बचाव करत पर्यटनासाठी हजारोंची पावले या थंड हवेच्या स्थळी वळतात. यामध्ये राज्यासोबतच गुजरात, कर्नाटकमधून येणारे पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. परंतू यंदा मार्चपासूनच राज्यात सर्वत्र तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. अनेक शहरा-गावांचे तापमान चाळीशी पार गेले. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरचे तापमानही यंदा चढेच राहिले आहे.

हेही वाचा…“ना ना करते प्यार…”, लिफ्टमधील फडणवीसांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाले, “गुप्त बैठका…”

दरवर्षी साधारण एप्रिल ते जूनमध्येदेखील महाबळेश्वरचे तापमान २५ ते ३० डिग्री सेल्सिअस राहते. ते यंदा प्रथमच अनेक दिवस चाळीशीच्या पार गेले होते. उन्हाच्या या तडाख्यासोबतच दिवसभर जाणवत राहणाऱ्या असह्य उकाड्याने देखील यंदा हा परिसर हैराण झालेला होता. हा असह्य उन्हाळा, वाढता उष्म्या आणि जोडीने रोज संध्याकाळी कोसळणारा जोरदार पाऊस यामुळे या थंड हवेच्या पर्यटनस्थळाचे वातावरण यंदा बिघडले होते. यामुळे आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरच्या पर्यटनाची घडीच यंदा विस्कटलेली दिसून आली. आलेला पर्यटक छान आल्हाददायक वातावरणात फिरण्याऐवजी तो उन, पावसापासून बचाव करण्यातच अडकून पडला. यामुळे या पर्यटनस्थळावरच्या त्यांच्या आनंदावर विरजन पडताना दिसले.

उन्हाच्या टोप्या आणि पावसाची छत्री

यंदाच्या बिघडलेल्या हवामानामुळे इथे येणारे पर्यटक सकाळी उन्हाच्या टोप्या घेऊन निघत होते. तर संध्याकाळ होऊ लागताच त्यांना पावसाळी छत्र्याही उघडाव्या लागत होत्या. उन्हामुळे फिरण्यावर जशा मर्यादा येत होत्या तसेच संध्याकाळ झाली की कोसळणारा पाऊस त्यांची वाट रोखत होता. महाबळेश्वरच्या बाजारपेठेत तर यंदा प्रथमच उन्हापासून संरक्षणासाठी संपूर्ण रस्त्यावर हिरव्या कापडाचे छत लावावे लागले. गंमत अशी की याच छताखालून संध्याकाळी पावसापासून बचाव करत छत्र्या घेऊन फिरणारे पर्यटक दिसत होते.

हेही वाचा…उद्धव ठाकरेंची टीका, “महाराष्ट्रात महागळती आणि लीकेज सरकार, यांना लाज, लज्जा, शरम…”

व्यावसायिकांना मोठा फटका

या बिघडलेल्या हवामानामुळे यंदा इथे पर्यटक कमी आले. ज्यांनी आगाऊ नोंद केली त्यांनी या हवामानाचा अंदाज घेत आपली भेट रद्द केली. इथे आलेले पर्यटकही फार काळ न रेंगाळता अन्यत्र वळाले. या साऱ्याचा फटका पाचगणी-महाबळेश्वरच्या अर्थव्यवस्थेलाही यंदा बसला आहे. पर्यटकांनीच पाठ फिरवल्यामुळे फेरीवाले, छोटे मोठे विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, प्रवासी वाहतूकदार, नौकानयन- अश्वारोहण व्यावसायिक या साऱ्यांच्या उलाढालीवर यंदा याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

यावर्षी ऐन उन्हाळी हंगामात निवडणुका होत्या. त्यातच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरचे हवामानही यंदा कधी नव्हे ते बिघडले. कडक उन्हाळा, असह्य उष्मा आणि रोज संध्याकाळी कोसळणारा पाऊस याने हे थंड हवेचे पर्यटनस्थळही बेजार झाले. पर्यटक कमी आले, आलेले पर्यटकांच्या फिरण्यावरही मर्यादा आल्या. या साऱ्यांचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. – योगेश बावळेकर, व्यावसायिक, महाबळेश्वर.

हेही वाचा…चंद्रकांत पाटलांनी विधान भवनात घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

दरवर्षी महाबळेश्वर येथे साडेअठरा लाख पर्यटक येत असतात. यातील बहुसंख्य पर्यटक हे उन्हाळ्यात येतात. मात्र या वर्षी कडक उन्हाळा, अवकाळी पाऊस, निवडणुकांमुळे पर्यटकांच्या संख्येवर मोठा परिणाम झालेला दिसत आहे. दरवर्षीच्या तुलनेत पर्यटकांच्या संख्येत यंदा तब्बल ३० टक्क्यांची घट झाल्याचे दिसत आहे. या पर्यटकांकडून घेतल्या जाणाऱ्या प्रवेश शुल्कांतही यामुळे ३० टक्क्यांनी घट झाली आहे. – आबाजी ढोबळे, कार्यालयीन अधीक्षक, महाबळेश्वर गिरीस्थान पालिका