विश्वास पवार
महाराष्ट्राचे नंदनवन, जागतिक दर्जाचे थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरला आतापर्यंत पर्यटनस्थळाच्या वर्गवारीत स्थान मिळाले नव्हते. पण शासनाने ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून महाबळेश्वरला मान्यता दिल्याने पर्यटन विकासाला चालना मिळू शकेल.
वर्षांकाठी या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी पंधरा ते वीस लाख पर्यटक भेट देतात. राज्य शासनाने नुकतीच महाबळेश्वर नगरपालिका क्षेत्रास ‘एक विशेष बाब’ म्हणून ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता दिली आहे.
एक तीर्थक्षेत्र व एक धार्मिक स्थळ म्हणून महाबळेश्वरची फार पूर्वीपासून ओळख आहे. इंग्रजांच्या आगमनाने इथला चेहरामोहराच बदलून गेला. इथल्या विविध पॉइंट्सची नावे ऐकली तरी आपणास इंग्रज अधिकाऱ्यांची आठवण होते. सर जॉन माल्कम या इंग्रज अधिकाऱ्याच्या ‘महाबळेश्वरवरील प्रेमापोटी इथली बाजारपेठ वसवली गेली. या बाजारपेठेचे माल्कमपेठ असे नामकरण करण्यात आले. सन १९१८ मध्ये इंग्रजांनी आपल्या सैनिकांसाठी सरकारी दवाखाना व अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृहे बांधली. या इंग्रज अधिकाऱ्यांनी अनेक चिनी कैद्यांना आपल्या सेवेसाठी महाबळेश्वरला आणले होते. याच कैद्यांकडून त्यांनी रस्ते, घरे, बंगले बांधून घेतले. याचवेळी महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी, राजबेरी, मलबेरी व इतर फळभाज्यांच्या शेतीस खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. कालांतराने येथील रहिवाशांना या शेतीच्या माध्यमातून व्यवसाय व उत्पन्नाचे नवे साधनच उपलब्ध झाले आणि महाबळेश्वर पर्यटनस्थळाच्या दिशेन वाटचाल सुरू झाली.
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिकेची स्थापना १८६४ साली झाली. येथे येणाऱ्या पर्यटकाला आज घोडेस्वारीपासून – गो-कार्टिगपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध झाल्या असून येथील स्थानिक लोकांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, फुले, हाताने घडविलेल्या चामडय़ाच्या चप्पल्स येथे सहज उपलब्ध होतात. महाबळेश्वर शहराला पर्यटनस्थळ वर्गवारीमध्ये स्थान मिळाले नव्हते. मात्र नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे यांनी शहरास पर्यटनस्थळाच्या वर्गवारीचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी सलग दोन वर्षे पाठपुरावा केला. महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेकडून १३ जुलै २०१९ रोजी ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे फेब्रुवारी महिन्यात कुटुंबासमवेत महाबळेश्वर येथे खासगी दौऱ्यानिमित आले होते. त्यांनी येथील राजभवनातील ‘दरबार’ हॉल येथे बैठक घेतली. यावेळी महाबळेश्वर पर्यटनस्थळाची देशात वेगळी ओळख असावी असे सांगत, शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात पर्यावरणास हात न लावता पर्यटनवाढीस प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते. वेण्णालेक सुशोभीकरण प्रस्तावाचे सादरीकरण केले होते. याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महाबळेश्वर पालिकेच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महाबळेश्वर विकासाचे सादरीकरण केले होते. मार्च महिन्यामध्ये झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात महाबळेश्वर पांचगणीच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांची भरीव तरतूद देखील करण्यात आली आहे.
याबाबत महाबळेश्वर नगरपालिकेस २८ सप्टेंबर २०२० रोजी प्राप्त झालेल्या शासन निर्णयानुसार सदर पर्यटनस्थळाचे राज्यस्तरीय महत्त्व, मोठय़ा प्रमाणात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या, ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व इ. बाबी विचारात घेता, निकष व कार्यपद्धती अपवाद करून ‘एक विशेष बाब’ म्हणून महाबळेश्वर नगरपालिका (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) क्षेत्रास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यास शासनाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व सातारा जिल्ह्य़ाचे रहिवासी आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वरला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून दिला आहे. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.
– स्वप्नाली शिंदे, नगराध्यक्षा, महाबळेश्वर
महाबळेश्वरला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे येथील पर्यटन वाढीसाठी पर्यटकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी एकूणच शहराच्या प्रगतीसाठी शासनाकडून पर्यटन निधी मिळू शकेल व त्यातून शहराचा चांगल्या प्रकारे विकास करता येईल.
– पल्लवी भोरे पाटील, मुख्याधिकारी महाबळेश्वर