सातारा: सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे राज्याचे पर्यटनस्थळ असलेले महाबळेश्वर गेले चार दिवस पर्यटकांची फुलून गेले होते. महाबळेश्वरचे मुख्य आकर्षण असलेल्या वेण्णालेक व परिसर, पुरातन श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरांसह विविध प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची चांगलीच रेलचेल होती. पर्यटकांच्या आगमनाने उन्हाळी हंगामात आता खऱ्याअर्थाने प्रारंभ झाला आहे.

गेल्या गुरुवारपासून सरकारी कार्यालये, शाळांना शुक्रवार वगळता सलग सुट्टी आल्याने अनेकांनी शुक्रवारची रजा काढत महाबळेश्वरला येणे पसंत केले आहे. सलग सुट्ट्या आणि राज्यातील वाढलेले तापमान यामुळे पर्यटकांकडून महाबळेश्वरला अनेकांची पसंती मिळत आहे.

उन्हाळी हंगामास आता खऱ्याअर्थाने प्रारंभ झाला आहे. महाबळेश्वर पर्यटनस्थळाचे मुख्य आकर्षण वेण्णालेक नौकाविहार व चौपाटीवर मका कणीस, मका फ्रँकी अश्या गरमागरम पदार्थांवर ताव मारण्यासोबतच आलेदार चहा, भेळ पाणीपुरी तसेच आईसगोला, स्ट्रॉबेरी विथ क्रीम सारख्या थंडगार पदार्थांची चव चाखताना पर्यटक दिसत आहेत.

हौशी पर्यटक वेण्णालेकवर घोडेसवारीचा आनंद लुटताना दिसत आहेत. बालचमूसाठी विविध गेम्सची धूम आहे. येथील प्रसिद्ध केट्स पॉईंट, महाबळेश्वरची शान असलेला ऑर्थरसीट पॉईंट, शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले प्रतापगड, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला लॉडवीक पॉइंट शहरानजीकचा सूर्योदयासाठी प्रसिद्ध विल्सन पॉइंट, सूर्यास्तासाठी प्रसिद्ध मुंबई पॉइंट अश्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांना फेरफटका मारण्यासोबतच येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत.

महाबळेश्वर मुख्य बाजारपेठेत सायंकाळी पर्यटकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. प्रसिद्ध चविष्ठ पदार्थांची चव पर्यटक चाखताना दिसत आहेत. तसेच बाजारपेठेतील प्रसिद्ध आकर्षक अशी लाकडी काठी, विविध आकर्षक वस्तू, प्रसिद्ध चप्पल खरेदीसह चणा, चिक्की, अश्या महाबळेश्वरी पदार्थ खरेदीसाठी पर्यटकांचा कल असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या मुख्य बाजारपेठेत सुशोभीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. महाबळेश्वरच्या महापर्यटन महोत्सवाआधी हे कामे पूर्णत्वास जाणार आहेत. येत्या उन्हाळी हंगामात बाजारपेठेचे आगळेवेगळे रूप पर्यटकांना पाहावयास मिळणार आहे. महापर्यटन महोत्सवाची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

राज्यात उष्णतेची लाट असताना महाबळेश्वर शहरामध्ये मात्र थंड वातावरण व धुक्याची सुंदर चादर पहाटे, मध्यरात्री दिसून येत आहे. भारताला काश्मीरचा स्वर्ग म्हटले जाते, त्याप्रमाणे महाबळेश्वरास राज्याचा स्वर्ग म्हटले तर वावगे ठरू नये. कडाक्याची उष्णता असताना देखील थंडीचा अनुभव पर्यटक व स्थानिक घेत आहे. येथील वातावरण बदलाचा पर्यटक आनंद घेत आहेत.