वाई : महाबळेश्वर पाचगणी ही पर्यटन स्थळे खुली करण्यास सातारा जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र करोना संसर्गाचे नियम पर्यटकांना पाळावेच लागणार आहेत. मागील चार महिन्यांपासून महाबळेश्वर पाचगणी येथील पर्यटन स्थळे बंद होती. करोना संसर्ग वाढल्यामुळे पर्यटन स्थळ ही बंद करण्यात आली होती. पर्यटक महाबळेश्वरला येत होते आणि फक्त बाजारपेठेत फीरूनच ते पुन्हा परत जात होते. त्यांना पॉईंटवर जाण्यास व वेण्णा लेक मधील नौकाविहार करण्यास बंदी होती. दरम्यान, सातारा जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
महाबळेश्वर येथील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी चालक संघटनेने केलेल्या मागणी मुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन स्थळ खुली करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे महाबळेश्वर पाचगणी येथील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. करोना संसर्ग हळू हळू कमी होऊ लागल्याने प्रशासनाने लागू केलेले निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. बाजारपेठे प्रमाणे येथील पॉईंटही पर्यटकांना पर्यटकांसाठी खुले झाले आहेत. महाबळेश्वर येथील आढावा बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, उपवनसंरक्षक महादेव मोहिते आदी यावेळी उपस्थित होते. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील पॉईंटची पडझड झालेली आहे. याबाबत ताबडतोबीने डागडुजी व दुरुस्ती करण्यात यावी, असे आदेशही वनविभागाला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले. पर्यटन व्यवसाय खुला झाल्याने पर्यटकांना आता एक वेण्णा लेकनौका विहार ,पॉईंट, लिंगमळा धबधबा याचा आनंद घेता येणार आहे. यामुळे महाबळेश्वर मधील गर्दी आता वाढणार आहे. पावसाळी महाबळेश्वरचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. मात्र करोना संसर्गाचा प्रादुर्भाव संपलेल्या नसल्याने पर्यटकांना नियम पाळावे लागणार आहेत.