वाई : ऐन उन्हाळी हंगामात महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावळी परिसरात स्थानिक आणि पर्यटक कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. आज तर महाबळेश्वरच्या वेण्णालेकसह लगतच्या परिसरात दवबिंदूचे हिमकणात रुपांतरण झाल्याचे पाहावयास मिळाले. वेण्णालेक जेट्टीसह वेण्णालेक परिसरातील वाहनांच्या टपांवरदेखील मोठ्या प्रमाणावर हिमकण जमा झाल्याचे पाहावयास मिळाले. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर या परिसरात अचानक थंडीही अवतरली आहे. महाबळेश्वर येथे मागील काही दिवसांपासून पारा घसरत आहे आणि कडाक्याची थंडी पडत आहे.
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर व थंडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी मागील काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. शहरात थंडीसोबतच गार वारे वाहत आहेत. मागील काही दिवसांपासून रात्री नऊ दहापासून थंडीला सुरुवात होत आहे. पहाटे पहाटे कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत आहे.
हेही वाचा – “…म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला”, सुहास कांदेंचा मोठा गौप्यस्फोट
बदललेल्या वातावरणाने आज पहाटे वेण्णालेकसह लगतच्या परिसरात दवबिंदूचे हिमकणात रुपांतरण झाल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. वेण्णालेक जेट्टीसह वेण्णालेक परिसरातील वाहनांच्या टपांवरदेखील मोठ्या प्रमाणावर हिमकण जमा झाल्याचे पाहावयास मिळाले. शहरासह तालुक्यात
मागील काही दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. वेण्णालेकसह परिसरातील रेस्टॉरंट, हॉटेल्सबाहेर सायंकाळी थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार अनेकजण घेत असल्याचे पाहावयास मिळत आहेत. महाबळेश्वरच्या या कडाक्याच्या थंडीमुळे सायंकाळी येथील मुख्य बाजारामध्ये फिरताना पर्यटक शाल, स्वेटर, कानटोपीचा वापर करत आहेत. एकूणच ऐन उन्हाळ्यात थंडीचा अनुभव आल्याचे अनेक वर्षात ऐकलेले नाही, असे स्थानिकांनी सांगितले. यावेळी वातावरणात मोठे बदल होत आहेत, त्याचा परिणाम हवामानावर होत आहे. पिकेही अडचणीत येत आहेत.