सातारा : महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव २०२५ चे २ ते ४ मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला राज्यभरातून पर्यटक येणार असून, कोणत्याही पर्यटकाची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्वांनी समन्वयातून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

महाबळेश्वर येथील वन विभागाच्या हिरडा विश्रामगृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, अजित पाटील, सोनाली मेटकरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, उत्सव कालावधीत गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. महाबळेश्वरला येण्यासाठी वाई, सातारा कोकणातून रस्ते आहेत. या रस्त्यांवरील कामे व महाबळेश्वर अंतर्गत रस्त्यांची कामे उत्सवापूर्वी पूर्ण करावीत. त्याचबरोबर महाबळेश्वर शहर सुशोभीकरण करावे. या उत्सवाला जास्तीत जास्त पर्यटक येण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करून प्रसिद्धी द्यावी. या उत्सवामध्ये स्थानिक व्यावसायिकांचाही सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.

पार्किंगची व्यवस्थेपासून बसमधून पर्यटकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोच करावे. आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. आरोग्यदृष्टीने आराखडा तयार करावा. विविध विभागांनी उत्सवासंदर्भातील कामे पूर्ण करावी. विविध प्रकारच्या ऐतिहासिक थीमचा वापर करून कार्यक्रमाच्या ठिकाणचे प्रवेशद्वार तयार करावे. सांस्कृतिक कार्यक्रममध्ये स्थानिकांचा सहभाग घ्यावा. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटन पॉईंटचे पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करावे. त्याचबरोबर कृषी विभागाने उत्सव काळात तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करावे, अशा सूचनाही केल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन म्हणाल्या, उत्सव कालावधीमध्ये बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री होण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून द्यावे.

पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या कालावधीत गर्दी होणार नाही व वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही, याची दक्षता पोलीस विभागाकडून घेतली जाईल. घाटातील ज्या ठिकाणी कठडे तुटलेले आहेत, त्या ठिकाणी कठडे दुरुस्त करावेत. वाहन बंद पडल्यास ते हलवण्यासाठी क्रेनची व्यवस्था केली जाईल.