वाई: दिवाळीच्या सलग सुटय़ांमुळे थंड हवेचे निसर्गरम्य गिरिस्थान महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले आहे. पर्यटक हिरवाईने नटलेले निसर्गसौंदर्य पाहण्यात, अनुभवण्यात मश्गुल झाले असून  गुलाबी थंडीची मजा लुटताना दिसत आहेत. मात्र महाबळेश्वरकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांसह स्थानिकांना तासंतास अडकून पडावे लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळी हंगामास प्रारंभ झाला असून देशविदेशातील पर्यटकांची रेलचेल या निसर्गरम्य पर्यटनस्थळी वाढली आहे. सध्या सलग दिवाळी सुटी आल्याने महाबळेश्वरकडे पर्यटक सहलीसाठी आकर्षित झाले आहेत. येथील प्रसिद्ध केट्स पॉईंट, ऑर्थरसीट पॉईंट, किल्ले प्रतापगड,श्री क्षेत्र महाबळेश्वर  मंदिर, लॉडवीक पॉइंट सूर्योदयासाठीचा प्रसिद्ध विल्सन पॉइंट,सूर्यास्तासाठी प्रसिद्ध मुंबई पॉईंटसह लिंगमळा धबधबा येथे पर्यटकांची पसंती आहे.

वेण्णालेक येथे नौकाविहारासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्या आहेत. उत्साहात सर्व जण नौकाविहार करताना व घोडेसवारीचा आनंद लुटताना दिसत आहेत. बालचमूसाठी विविध गेम्सची धूम आहे. खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थ, गरमागरम मका कणीस, फ्रँकी, पॅटिस, पाणीपुरी, भेळ, पावभाजी, मॅगी या व अशा पदार्थावर ताव मारताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत. तसेच, महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीची अनुभूती पर्यटक घेत असून शाल, मफलर, कानटोपी अशी उबदार वस्त्रे परिधान करून फेरफटका मारताना दिसत आहेत.

दिवाळी पर्यटकांच्या स्वागतासाठी येथील मुख्य बाजारपेठा सजल्या आहेत. बाजारपेठेतील प्रसिद्ध चप्पल, चणे, जाम, जेली, चॉकलेट फज अशा वस्तूंची खरेदी करण्यासोबतच अशा थंडीतही थंडगार आइसगोळावर ताव मारताना  दिसत आहेत. बाजारपेठेतील प्रसिद्ध आकर्षक अशी लाकडी काठी व विविध आकर्षक वस्तू खरेदीकडेदेखील पर्यटकांचा कल असल्याचे पाहावयास मिळत आहे. बाजारपेठेतील रेस्टॉरंट्स देखील दिवाळी निमित्त सजली आहेत. महाबळेश्वर पर्यटनास येणारे पर्यटक सध्या गावाबाहेर झालेले हॉटेल्स, विना परवाना बंगलो, लॉजिंगला राहणे पसंत करीत असून परंपरागत असलेले हॉटेल्स लॉजिंगच्या व्यवसायावर  मोठा परिणाम झाला आहे.

पर्यटनस्थळी वाहतूक कोंडी

महाबळेश्वर पर्यटनस्थळी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाने हंगामपूर्व नियोजन न केल्याने वाहतूक कोंडीची समस्या झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. वेण्णालेक या गर्दीच्या ठिकाणी वाहतूक ठप्प होत आहे. वाहतूक कोंडी झाल्याने तासनतास पर्यटकांसह स्थानिकांना रस्त्यात अडकून पडावे लागत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahabaleshwar was crowded tourists holidays diwali scenery cool air ysh