साताऱ्यात थंडीचा कडाका वाढला असून राज्याचे मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणी येथे तापमानाचा पारा घसरला आहे. आज पहाटे कडाक्याची थंडी पडली असून पाचगणीचा पारा घसरला होता. थंडी वाढल्याने गवतावर पडलेले दवबिंदू काही प्रमाणात गोठले. वाईला तसंच पाचगणी महाबळेश्वरला थंडीचा मोठा कडाका आहे. आज पहाटेपासून सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. वाई शहर, कृष्णा नदीपात्र आणि गणपती घाट धुक्यात हरवला होता.
दरवर्षी डिसेंबर महिन्यात महाबळेश्वर येथील वेण्णालेकवरील दवबिंदू गोठत असतात. यंदा मात्र जानेवारीमध्ये गुलाबी थंडी पडली असल्याने दवबिंदू गोठण्यास सुरुवात झाली आहे. करोनामुळे पर्यटनस्थळं बंद केल्याने पर्यटकांना मात्र याचा आनंद घेता येत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
वाढत्या थंडी आणि धुक्याचा सामना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना दूध विक्रेत्यांना, तसंच औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. या धुक्यामुळे ज्वारीसह, भाजीपाला,फळबागांना, पिकांना मात्र मोठा फटका बसणार आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, सातारा, वाई, जावली, महाबळेश्वर,खंडाळा, फलटणसह माण, खटावमध्येही धुक्याची झालर पसरलेली होती.
पाचगणी व परिसरात ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले असून हवामान बदलामुळे ढग पाचगणीच्या निसर्गात एकरूप झाल्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना आणि स्थानिकांना पाहायला मिळाले. पाचगणी शहर व परिसरावर ढगांचे लोट पसरले असल्याने आज सकाळच्या सुमारास जम्मू-काश्मीरसारखा नजारा पाहायला मिळाला.
हवामान विभागाकडून राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर-पाचगणी येथे आज पहाटे हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवामानात बदल झाला आहे.