जानेवारीपासून कोकणात सर्वत्र वणव्याचे साम्राज्य दिसून येते. पावसाळ्यात आकर्षण ठरणारे हिरवेगार डोंगर या काळात काळेभोर झालेले असतात. हे दुष्टचक्र कसे सुरू होते, ते थांबवता येईल का याचा विचार अनेक निसर्गप्रेमी संस्था करीत असताना प्रशासनाने यावर ठोस कार्यवाही करावी याची जाणीव महाडचे उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांना झाली आणि वणवाविरोधी अभियानाच्या दुसऱ्या वर्षीदेखील महाड व पोलादपूर तालुक्यातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांच्यामध्ये जाणीवजागृती व्हावी म्हणून आज एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
वणव्याचे दुष्टचक्र संपविणे हे गावातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे या भावनेतून आज महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात वणवाविरोधी अभियानाचा जनजागृती कार्यक्रम आज प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी व्यासपीठावर महाडचे सभापती विजय धोंडगे, पोलादपूरचे सभापती दिलीप भागवत, महाड व पोलादपूरचे गटविकास अधिकारी, वनखात्याचे अधिकारी, हिरवळ प्रतिष्ठानचे दीपक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकेत वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वनाचे महत्त्व व वणव्यामुळे होणारे दुष्परिणामाची जाणीव करून दिली. अशा प्रकारच्या कार्यक्रमाची आखणी प्रांताधिकारी यांनी केली त्याबद्दल त्यांनी प्रांताधिकारी हजारे यांचे विशेष कौतुक केले. सभागृहाबाहेर वनखात्यामार्फत भित्तिपत्रकाचे प्रदर्शन आयोजित केले होते.
या वेळी महाड तालुक्यातील मोहोप्रे, करंजखोल व पोलादपूर तालुक्यातील काटेतळी या गावांचा वणवा रोखल्याबद्दल व जंगल राखल्याबद्दल विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
मनोगतात हिरवळ प्रतिष्ठानचे सदस्य व सह्य़ाद्री वाहिनीचे प्रतिनिधी दीपक शिंदे यांनी वणवाविरोधी अभियानाचे मुख्य सूत्र म्हणजे गावातील तरुणांनी वणवाविरोधाची जाणीव सतत जागती ठेवणे असे सांगून कोकणचे वैभव टिकविण्यासाठी गावागावातील वणवा थांबविला पाहिजे, याकरिता प्रशासनाने एक पाऊल टाकले आहे तर दोन पावले आपण पुढे टाकली पाहिजेत असा संदेश त्यांनी दिला.
सभापती विजय धाडवे व दिलीप भागवत यांनी आपल्या भाषणात तालुक्यात वणवाविरोधी अभियानासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा विश्वास दिला. महाडचे पोलीस निरीक्षक जगदाळे यांनी वणवा लावलेल्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा गर्भित इशारा आपल्या मनोगतात दिला.
प्रांताधिकारी हजारे यांनी आपल्या भाषणात जोपर्यंत महाड-पोलादपूर तालुक्यातील वणवा लागणे कमी होणार नाही तोपर्यंत हे अभियान दरवर्षी सुरू राहणार असा सूर ठेवत वणव्याची दाहकता, त्यामुळे कोकणसह महाराष्ट्रातील ताडोबासारख्या परिसरात होत असलेले नुकसान, वर्ल्ड हेरिटेजमध्ये पश्चिम घाटाचा झालेला समावेश, चाऱ्यासाठी चाललेली वणवण या साऱ्या घटनांचा ऊहापोह केला. महाड तालुक्यातील गेल्या वर्षीपासूनच्या अभियानामुळे झालेले चांगले परिणामाचे त्यांनी विशेष कौतुक केले. आता गावागावात ग्रामसभा व प्रभातफेरी काढून याची जाणीवजागृती केली यासाठी ग्रामस्थांनी याकरिता थोडे पुढे यायला पाहिजे असे सुचवीत हे अभियान प्रत्येकाला आपले आहे अशी जाणीव व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या वेळी दीपक शिंदे यांनी तयार केलेला लघुपट दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कु. खिलारे यांनी केले तर महाडचे नायब तहसीलदार कुंभार यांनी आभारप्रदर्शन केले.

Story img Loader