अलिबाग : महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर कारखान्यात झालेला स्फोट आणि त्यानंतर लागलेल्या आगीत अडकून पडलेल्या सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात तब्बल तीस तासांनंतर यश आले. अद्याप चार जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. बाहेर काढण्यात आलेले सर्व मृतदेह ओळख पटवण्यापलिकडे असल्याने मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात येणार असून त्यानंतर हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ब्ल्यू जेट या कारखान्याच्या पीपी प्लांटमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर रसायनाच्या पिंपांना आग लागली आणि वायूगळती झाली. त्यामुळे बाहेर न पडता आल्याने हे अकरा कामगार याच प्लांटमध्ये अडकून पडले होते. अडचणीच्या ठिकाणी असलेल्या या प्लांटमध्ये अग्निशमन वाहनांचे पाईप पोहोचू शकत नसल्याने आग विझविण्यात प्रचंड अडचणी आल्या. स्फोट, आग, वायूगळती आणि धूर यामुळे स्थानिक बचाव पथकांना पोहोचणे शक्य झाले नाही. भरीस भर म्हणून स्फोट झालेल्या प्लांटची इमारतदेखील धोकादायक स्थितीत आली होती.
हेही वाचा – स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे साखर चोरी उघड – राजू शेट्टी
स्थानिक बचाव पथके आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणेच्या आधारे अडकून पडलेल्या व्यक्तींना जीवंत अथवा मृत स्थितीत बाहेर काढणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एनडीआरएफ, कोलाड येथील सानप रेस्क्यू टीम आणि खोपोली येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सानप रेस्क्यू टीम आणि खोपोली येथील हनिफ कर्जीकर यांच्या टीमने मध्यरात्री या प्लांटजवळ जात शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर या स्फोटग्रस्त प्लांटच्या छताचे पत्रे दोर बांधून जेसीबीच्या सहाय्याने काढण्याचे काम करण्यात आले. ते पत्रे काढल्यानंतर सानप आणि कर्जीकर यांच्या पथकांनी आत जावून मृतदेह बाहेर काढण्यास प्रारंभ केला. धुमसत असलेली आग आणि प्रचंड धुराचा सामना करित पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास म्हणजे जवळपास अठरा तासांनंतर पहिला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर ७ जणांचे मृतदेह दुपारी बारा वाजेपर्यंत बाहेर काढले.
डीएनए चाचणीसाठी मृतदेह पनवेलला पाठविले
मृतांची ओळख पटविणे अवघड झाले आहे. अखेर डीएनए चाचणीद्वारे या मृतांची ओळख पटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . कलिना मुंबई येथील न्याय वैद्यक प्रयोगशाळेत ही डी.एन.ए. चाचणी करण्यात येईल. ही चाचणी करण्यासाठी हे सातही मृतदेह पनवेल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात येणार आहेत. त्या रुग्णालयात शवागार आणि शितपेट्या उपलब्ध असल्याने डीएनए चाचणीचा अहवाल येईपर्यंत मृतदेह त्याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. हा अहवाल येण्यास किमान आठ दिवस लागणार आहेत. तोपर्यंत हे मृतदेह पनवेल येथेच ठेवण्यात येणार असून, अहवालांती ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील.
मृतांच्या वारसांना मदत
या दुर्घटनेत मरण पावलेल्या कामगारांच्या वारसांना कारखान्याकडून ३० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली. याखेरीज मुख्यमंत्री मदत निधीतून पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – सांगली : ८० ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान, ११ गावे संवेदनशील
पालकमंत्री उदय सामंत यांची भेट
रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री तीन वाजता या कारखान्याला भेट दिली. त्यांनी प्रशासनातील त्याचप्रमाणे कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून या दुर्घटनेची माहिती घेतली. मृत कामगारांच्या वारसांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी कारखान्याच्या मालकांशी चर्चा करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
मृतांच्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ – अदिती तटकरे
या दुर्घटनेत ज्या कामगारांचा मृत्यू झाला आहे, त्या कामगारांच्या वारसांना राज्य शासनाच्या बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी घोषणा महिला आणि बालसंगोपन विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे.