महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या जलशुध्दीकरणाच्या कामास बुधवार पासून प्रारंभ झाला आहे. एका अमेरिकन कंपनीच्या यंत्राद्वारे हे जलशुध्दीकरणाचे काम करण्यात येत आहे.
राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असलेल्या चवदार तळ्याचे पाणी दरवर्षी खराब होत असते. त्यामुळे २० मार्च रोजी चवदार तळे सत्याग्रहच्या वर्धापन दिनी येणाऱ्या जनतेला हे पाणी पिता येत नाही. या पार्श्वभूमीवर हे जलशुद्धीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी चवदार तळ्याच्या पाण्याचे चांगल्या प्रकारे शुध्दीकरण केले जाईल, असे आश्वासन निवडणुकीअगोदर नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी दिले होते.
हे जलशुध्दीकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती दिनानिमित्त प्राप्त झालेल्या अनुदानातून करण्यात येत आहे. त्यामुळे महाडकरांसह जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे. सामाजिक व न्याय विभागाकडून चवदारतळे जलशुध्दीकरणासाठी महाड नगरपरिषदेला १ कोटी ३७ लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्याच्यातूनच हे काम करण्यात येत आहे.
या जलशुध्दीकरणासाठी लाँग डिस्टंन्स सर्क्युलेटर हे अमेरिकन कंपनीचे आधुनिक यंत्र पाण्यात सोडण्यात आले आहे. या यंत्राद्वारे व्हॅक्युम पंपाच्या सहाय्याने तळ्यातील पाणीवर खेचून त्याचे शुध्दीकरण केले जाणार आहे. पाण्यामध्ये ऑक्सिजन मिसळून साचलेली शेवाळ व अन्य कचरा कमी केला जाणार आहे. शुध्दीकरणाची ही प्रक्रिया पाच वर्षे सुरू राहणार असल्याचे सांगून ही प्रक्रिया करीत असताना तळ्यातील जैव विविधता व जीवांची हानी होणार नाही याची काळजीही घेतली जाणार असल्याची माहिती नगरअभियंता सुहास कांबळे यांनी दिली.