मागील दोन दिवस कोकणात आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. मुसळधार पाऊस कोसळत असताना दरडीआड दबा धरून बसलेल्या काळाने डाव साधला आणि काही क्षणांत अनेकांचे संसार चिखलात रुतून गेले. हजारो माणसांना जीव घेऊन सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. अनेक ठिकाणी दरडी कोसल्याच्या घटना घडल्या. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्यांना आता बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे. मात्र, जी माणसं बाहेर काढली जात आहे, त्यांच्यात प्राणच राहिलेले नाहीत. आतापर्यंत ४४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, तब्बल ५० पेक्षा अधिक माणसं अजूनही ढिगाऱ्याखालीच असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रविवावारपासून राज्याच्या काही भागांत मुसळधार पावसाचा तडाखा बसला. कोकणावर तर पुराचं संकटच ओढवलं. संततधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळये गावावर दरड कोसळली. गुरुवारी झालेली ही घटना शुक्रवारी समोर आली. प्रचंड पाऊस आणि विविध भागांचा तुटलेला संपर्क यामुळे वेळेत मदत पोहचू शकली नाही. त्यामुळे प्रचंड जीवितहानी झाली.
रायगड जिल्ह्यात इतर ठिकाणीही दरड कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या. दरड कोसळेल्या ठिकाणी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मदतीसाठी एनडीआरएफबरोबरच लष्करालाही पाचारण करण्यात आलं असून, शनिवारी सकाळपर्यंत ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचे ४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोन ठिकाणाहून हे मृतदेह काढण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. त्याचबरोबर ३५ जखमी झालेले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
एका ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरूच आहे. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी असून, ५० पेक्षा अधिक लोकांचे मृतदेह ढिगाऱ्याखाली दबलेले असण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाकडून बचावकार्याला वेग देण्यात आला आहे.
At one location, rescue operation still continues. According to officials and staff present at the spot, around 50 more people are feared trapped under the debris: Raigad District Collector, Nidhi Chaudhary #Maharashtra
— ANI (@ANI) July 24, 2021
वेळेवर मदत मिळाली असती तर…
अतिवृष्टी झाल्याने गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास वरंध घाट परिसरातील तळये गावातील कोंडाळकर वाडीवर दरड कोसळली. ३५ पैकी ३२ घरं दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. तर दुसरीकडे पूरपरिस्थिती आणि संपर्क यंत्रणाच कोलमडलेली असल्यानं दुर्घटनास्थळी वेळेवर मदत पोहोचू शकली नाही. शुक्रवारी सकाळी पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर मदतकार्य सुरू झालं; पण तोपर्यंत अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. वेळेत मदत मिळाली असती, तर अनेकांचे जीव वाचवता आले असते.