अजित पवारांसह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पण, अद्यापही मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळाली नसल्याने शिंदे गट आणि अपक्ष आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपाला इशारा दिला आहे. आगामी काळात भाजपाने आमचा विचार केला नाही, तर एकला चलोची भूमिका घ्यावी लागेल, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.
महादेव जानकर यांनी पंढरपूरातील श्री. विठ्ठल मंदिर येथील संत नामदेव पायरी पासून ‘जनस्वराज्य यात्रे’चा शुभारंभ केला. राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जानकर यांनी ही यात्रा काढली आहे.
हेही वाचा : “मी घरी बसून होतो पण कुणाचीही घरं फोडली नाहीत”, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महादेव जानकर म्हणाले, “जनतेने खऱ्या माणसाला आणि पक्षाला मत दिलं पाहिजे, असं आवाहन यात्रेच्या माध्यमातून करणार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्यासाठी ही यात्रा सुरू केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ( एनडीए ) लोकसभेला जागा दिल्या नाही, तर एकला चलोरेची भूमिका घेणार आहे.”
“भाजपा आणि काँग्रेसवर किती दिवस अवलंबून राहायचं. आपला पक्ष वाढवण्याची गरज आहे. लोकसभेच्या ४८ मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. मी परभणी, माढा, बारामती आणि उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर येथून लढण्याची तयारी केली आहे,” अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे.
“मी आणि रत्नागर गुट्टे विधानसभेला निवडून आलो होतो. भाजपाने आम्हाला लोकसभेला जागा दिल्या नाही. तर, ४८ जागा लढणार आहे,” असा निर्धारही महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.