लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून देशात सात टप्प्यांत मतदान होणार आहे, तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्यामुळे महायुतीत आणखी एक पक्ष सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महाविकास आघाडीबरोबर जाण्याची शक्यता आहे.
माढा मतदारसंघातून महादेव जानकर आघाडीकडून लोकसभा लढवण्याची चर्चा चालू असतानाच २० मार्च रोजी महादेव जानकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बारामतीत जवळपास एक तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान नेमके काय ठरले? याबाबतची सविस्तर माहिती समोर आली नसली तरी जानकर यांनी यासंदर्भात सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
महादेव जानकर आणि शरद पवार यांच्या भेटीत काय ठरलं?
शरद पवार यांच्या भेटीनंतर महादेव जानकर म्हणाले, “इंतजार का फल मीठा होता है. शरद पवार राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. माढा मतदारसंघातील मतदानाला अजून अवधी असल्यामुळे कशी प्यादी सरकतात? त्या दृष्टीने आमची योजना सुरू आहे. त्यामुळे जनतेचा आशीर्वादच अंतिम असून याबाबत आता बोलणे योग्य नाही. माढा आणि परभणी या दोन्ही मतदारसंघांतील शेतकऱ्यांपासून ते नेत्यांपर्यंत आणि शिक्षकांपासून ते पत्रकारांपर्यंत दररोज जवळपास एक हजार फोन येतात. आम्ही महाविकास आघाडीकडे तीन जागा मागितल्या होत्या. मात्र, तीनपैकी दोन मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे”, असे महादेव जानकर यांनी सांगितले.
महाविकास आघाडीची भूमिका काय?
महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे आघाडीतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, याकडे अनेकांचे लक्ष आहे. आघाडीचे जागावाटप नेमके कुठे अडले? याबाबत प्रश्न विचारण्यात येत असतानाच जागावाटपाची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आघाडीतील नेत्यांकडून देण्यात येत आहे. आता राष्ट्रीय समाज पक्षाने आघाडीकडे दोन जागांची मागणी केली आहे. त्यामध्ये माढा मतदारसंघाचा समावेश आहे. यातच आज महादेव जानकर आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. मात्र, महादेव जानकर यांच्या मागणीबाबत महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसची भूमिका काय असणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.