Mahadev Jankar On Mahayuti : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या बैठका तर दुसरीकडे महायुतीच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. तसेच विधानसभेच्या जागावाटपाबाबतही खलबतं सुरु आहेत. लवकरच उमेदवारांची घोषणा देखील होणार असल्याची माहिती नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. असे असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभेच्या २८८ जागा स्वबळावर लढवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे महायुतीला धक्का बसला आहे. महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाबाबत राष्ट्रीय समाज पक्षाला विचारलं जात नसल्यामुळे महादेव जानकर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यातच आता महादेव जानकर यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : आधी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, आता शिंदेंच्या शिवसेनेलाही रामराम; ‘या’ महिला नेत्याची आठ महिन्यांत शिवसेनेला सोडचिठ्ठी!

महादेव जानकर काय म्हणाले?

“महायुतीमधील कोणावरही मी नाराज नाही. पण राष्ट्रीय समाज पक्षही या देशात मोठा पक्ष झाला पाहिजे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या बरोबरीत आला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. आमच्या पक्षाची ताकद किती आहे? ते आम्ही पाहणार आहोत. आमचे नशीब आम्ही अजमावणार आहोत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २८८ जागा आम्ही लढवणार आहोत. मी महायुतीबरोबर होतो. पण आता महायुतीबरोबर नाही”, असं मोठं विधान महादेव जानकर यांनी केलं आहे.

“मी महायुतीबरोबर होतो, तर त्यांनी आम्हाला लोकसभेला एक जागा दिली होती. त्याबद्दल त्यांचे आभार. मात्र, आता आम्हाला आमच्या पक्षाची ताकद पाहायची आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. आमच्या पक्षाला मान्यता मिळण्यासाठी कमीत कमी १२ आमदार किंवा दोन खासदार होणं गरजेचं आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अटी पूर्ण करण्यासाठी आम्हाला आमचे काही आमदार निवडून आणले पाहिजेत. त्यामुळे आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. महायुतीमधील कोणत्याही नेत्यांवर याबाबत चर्चा झाली नाही. आम्ही महायुती आणि महाविकास आघाडीवर नाराज नाही”, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahadev jankar announcement to withdraw from the mahayuti will contest the assembly elections independently gkt