लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडले. आता आणखी दोन टप्प्यातील मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान झालेले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे संजय उर्फ बंडू जाधव हे आमने-सामने होते. ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, याआधी महादेव जानकर यांनी एक मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा काही प्रमाणात फटका आपल्याला बसला असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रात ४८ जागांपैकी महायुतीला ४२ जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला फक्त ६ जागा मिळतील, असा दावा महादेव जानकर यांनी केला आहे. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

महादेव जानकर काय म्हणाले?

“परभणीची निवडणूक पार पडल्यानंतर मी महाराष्ट्रात जवळपास ५५ सभा घेतल्या आहेत. या सभांच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ दिला. आता मतदान संपल्यानंतर माझ्या मतदारसंघात येवून मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासंदर्भासह आदी प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर परभणीच्या कामांचे प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये घेण्यात यावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रयत्न करणार आहे”, असं महादेव जानकर म्हणाले.

हेही वाचा : शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य, “पंतप्रधान नरेंद्र मोदीच फक्त राहुल गांधींची टिंगल करतात, पण देश…”

ते पुढं म्हणाले, “परभणीच्या जनतेने कोणाला आशीर्वाद दिला हे ४ जून रोजी कळेल. मात्र, मी परभणीच्या जनतेचे आभार मानतो. कारण त्यांनी मला लवकर स्वीकारलं. विकासाच्या मुद्यांवर येथील जनतेनं माझ्यावर प्रेम केलं. यामध्ये सर्व समाजातील लोकांनी मला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ४ जून रोजी विजयाचा गुलाल हा माझा असेल असा विश्वास वाटतो”, असंही जानकर म्हणाले.

परभणीत जातीपातीचं राजकाण झालंय का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले “मी विकासाच्या माध्यमातून काम करतो. सब समान तो देश महान हा माझा अजेंडा आहे. माझ्या पक्षातून पहिले दोन आमदार हे मराठा समाजाचे झाले. माझ्या पक्षाचा एक विद्यमान आमदार हा ओबीसी आहे. तसेच काही ठिकाणी मुस्लिम समाजाचे नगरसवेक आहेत. त्यामुळे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा माझा अजेंडा आहे. मी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला माणनारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्व समाजाची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल. या इराद्याने पुढे चाललो आहे. मात्र, काही प्रमाणात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मला फटका बसला”, असंही महादेव जानकर यावेळी म्हणाले.

महायुतीला किती जागा मिळतील?

“महायुतीला ४२ जागा मिळतील तर महाविकास आघाडीला सहा जागा मिळतील. देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील आणि परभणीचा खासदार म्हणून मी शपथ घेईल”, असं महादेव जानकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahadev jankar big statement on manoj jarange patil maratha andolan in parbhani lok sabha constituency politics gkt