राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे अनेक वर्षांपासून एनडीएशी संबंधित आहेत. भारतीय जनता पार्टीशी युती करत त्यांच्या रासपने अनेक निवडणुका लढवल्या आहेत. परंतु, अलिकडच्या काळात जानकर हे भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांची नाराजी त्यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. अशातच महादेव जानकर आता एनडीएतून बाहेर पडतील, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. महादेव जानकरांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जानकरांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. महादेव जानकर हे प्रागतिक विकास मंच या राज्यातल्या तिसऱ्या आघाडीत सहभागी होऊ शकतात, असं मत शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.
माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी शेट्टी यांना विचारण्यात आलं की, तुमची सध्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर चर्चा सुरू आहे, महादेव जानकर तुमच्यासोबर येतील का? त्यावर राजू शेट्टी म्हणाले, होय! त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. मला खात्री आहे की तेसुद्धा एक दिवस आमच्याबरोबर येतील. कारण, एनडीएमध्ये त्यांची फार कुचंबना होत आहे.
दरम्यान, प्रागतिक विकास मंचाला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीकडून आर्थिक पाठबळ मिळत असल्याच्या आरोपांवरही राजू शेट्टी यांनी उत्तर दिलं. शेट्टी म्हणाले, आमचा अद्याप बीआरएसशी काहीही संबंध नाही. तो पक्ष अजून आमच्या प्रागतिक विकास मंचात सहभागी झालेला नाही. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा सुराज्य पक्ष स्थापन झाला आहे. हा पक्ष आमच्या मंचात सहभागी होऊ शकतो.
हे ही वाचा >> माफी मागत जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी, फोनही बंद; कारण काय? वाचा…
विरोधकांच्या नव्याने बनवलेल्या इंडिया (INDIA) आघाडीत सहभागी होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना राजू शेट्टी म्हणाले, नाही! आमचा आधीपासूनच प्रागतिक विकास मंच आहे, जो गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. यात असणाऱ्या छोट्या पक्षांना चळवळीची पार्श्वभूमी आहे. आम्ही या पक्षांबरोबरच काम करणार आहोत.