सोलापूर : भाजपपासून दुरावलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांनी आगामी लोकसभेची निवडणूक माढा आणि परभणी या दोन्ही जागांवर लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. या दोन्ही जागांवर भरघोस मतांनी निवडून येण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
सोलापूरच्या भेटीप्रसंगी जानकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आगामी लोकसभेच्या जागा देशात जेथे जेथे उमेदवार मिळतील त्या सर्व ठिकाणी लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यात महाराष्ट्रात सर्व ४८ आणि उत्तर प्रदेशात ८० जागांसह कर्नाटक, छत्तीसगड व अन्य राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा लढविण्याची व्यूहरचना आखली जात असल्याचे जानकर यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘आदर्श’ गैरव्यवहार ते ‘आदर्शवादी’ भाजपपर्यंतचा अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास
हेही वाचा – काँग्रेसला गळती आणि नेत्यांची भाजप व मित्रपक्षांकडे रीघ
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा तडकाफडकी राजीनामा दिल्याच्या घटनेवर भाष्य करताना जानकर यांनी, जी नेते मंडळी सत्य असतात, तीच पक्षात टिकून राहतात. ज्यांच्यापुढे काही अडचणी येतात, तेच वर्षानुवर्षे साथ दिलेला पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.