लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेते मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीनेही लोकसभेचं अपयश विसरून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे लक्ष वळवलं आहे. अशातच महायुतीमधील घटकपक्ष असेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीत त्यांना ५० जागा मिळाव्या, अशी मागणी केली आहे. महादेव जानकर यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण याआधी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानेही जवळपास ८० ते ९० जागांची मागणी केलेली आहे.

महादेव जानकर काय म्हणाले?

“राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीसाठी राज्याचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाची काय तयारी आहे? या संदर्भात आढावा घेण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात चिंतन आणि आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात किती विधानसभेच्या जागा लढवू शकतो. याचा आढावा घेण्यात येणार आहे”, असं महादेव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा : संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, “आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री आणि…”

किती जागांची मागणी करणार?

महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट १०० च्या आसपास जागा मागत आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गट ८० ते ९० जागा मागत आहे. राष्ट्रीय समाज पक्ष किती जागा मागणार? या प्रश्नावर उत्तर देताना महादेव जानकर म्हणाले, “आम्ही ५० जागांची मागणी करत आहोत. आमच्या आजच्या बैठकीत आम्ही याबाबतचा आढावा घेणार आहोत. आमच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की, १०४ जागा लढवण्याची तयारी आहे. मात्र, माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही. आता त्यांच्याशी चर्चा करणार आहे”, असं महादेव जानकर यांनी सांगितलं.

“आज महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष आहे. आपल्या पक्षाची ताकद वाढली तर महायुतीला फायदा होईल. तसेच महायुतीचाही आपल्याला फायदा होईल. युतीचा निर्णय हा नंतर असतो. मात्र, आधी आपल्या पक्षाची तयारी काय आहे? हे पाहणंही गरजेचं आहे. आम्ही सध्या आढावा घेत आहोत. त्यामुळे जागा वाटताना एक-दोन जागा कमी-जास्त होत असतात. पण आपण तयारी केली पाहिजे”, असं महादेव जानकर यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना जानकर म्हणाले, “महायुतीचं मी अभिनंदन करतो. कारण शिवसेना शिंदे गटाला १५ जागा दिल्या. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४ जागा दिल्या. त्यामध्ये एक जागा राष्टीय समाज पक्षाला दिली. मी माझ्या चिन्हावर निवडणूक लढवली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गटाने माझ्या विजयासाठी प्रयत्न केला. मात्र, त्या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या फॅक्टरमुळे थोडीसी अडचण आली”, असं सूचक विधान महादेव जानकर यांनी केलं.