करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्या कामाला गती आली असून शुक्रवारी दोन लेप लावण्यात आले. हे काम वेळेत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. या प्रक्रियेचे कलाकारीचे काम संपल्याने संजू बोरकर हे पथकातील एक कलाकार औरंगाबादला आज परत गेले. दरम्यान, मंदिरातील धार्मिक विधीअंतर्गत आज दहाव्या दिवशी युवराज्ञी संयोगिता राजे व मधुरिमा राजे यांनी सहस्र कुंकुमार्चन विधी केला. या वेळी समस्त श्रीपूजक महिलांनीही कुंकुमार्चन केले.
अंबाबाई मूर्ती संवर्धन प्रक्रियेचे काम पुरातत्त्व विभागाचे पथक करीत आहे. या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी बेहडा अर्क व बिब्ब्याचे तेल याचा वापर करून दोन लेप मूर्तीला लावले. धार्मिक विधीअंतर्गत महिलांनी सौभाग्यवृद्धीसाठी श्री महालक्ष्मी सहस्रनामाने श्री जगदंबेच्या पादुकांवर कुंकुमार्चन केले. तसेच मुख्य हवनकुंडात महालक्ष्मी सहस्रनामाचे हवन व ब्रहती सहस्रनाम महाविष्णू होमाचे पुण्याहवाचन झाले. रात्री पालखी सोहळय़ाच्या वेळी अशोक साळोखे व सहकाऱ्यांनी सनईवादन केले.

Story img Loader