समृद्धी महामार्गावर एका खासगी बसला झालेल्या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तसंच समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं तेव्हापासून सातत्याने अपघातांची संख्या वाढते आहे. आता बुलढाणा येथील अपघातातल्या मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून महामार्गावर महामृत्यूंजय यंत्र बसवण्यात आलं आहे. तसंच महामृत्यूंजय मंत्राचा सव्वा कोटी जपही करण्यात आला. या सगळ्या घटनेवर अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी परखड भाष्य केलं आहे. समस्यांवर दैवी उपाय शोधणं हे समाज अधोगतीकडे नेणं आहे. त्यापेक्षा त्यावर योग्य ते उपाय योजले पाहिजेत असं हमीद दाभोलकर यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हमीद दाभोलकर यांनी नेमकं काय म्हटलंय?

“अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालविकास मार्ग दिंडोरी यांनी हे यंत्र बसवलं आहे. तसंच त्यानंतर त्यांनी हा दावा केला आहे की हे यंत्र बसवल्यानंतर पाच ते दहा किमी.च्या परिसरात अपघात होत नाहीत. जर अपघात झालाच तर ती व्यक्ती दगावत नाही. अशा प्रकारे दैवी शक्तीचा दावा करणे, त्यातून लोकांना फसवणं आणि ठकवणं हा जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा आहे. याबाबत पोलिसांनी दखल घ्यावी म्हणून अंनिसने मागणी केली होती. आमच्या मागणीची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि चौकशी करत आहेत. एका बाजूला कुणावर तरी श्रद्धा असणं आणि त्यातून व्यक्तीला भावनिक आधार वाटणं ही वेगळी गोष्ट आहे. परंतू त्याच्या नावाखाली दैवी चमत्काराचा दावा करणं आणि लोकांना फसवणं हा गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणी कारवाई होणं आवश्यक आहे.” अशी प्रतिक्रिया अंनिसच्या डॉ. हमीद दाभोलकर यांनी लोकसत्ता ऑनलाइनला दिली.

हे पण वाचा- समृद्धी महामार्ग अपघात!, सानुग्रह मदतीचा निधी पोहचला, आजपासून वाटप

समस्यांना दैववादी उत्तरं शोधल्याने समाजाची अधोगती

“रस्त्यावर जे अपघात होतात त्याला भौतिक कारणं असतात. रस्त्यांची स्थिती, ड्रायव्हरचं आरोग्य, त्याची व्यसनाधिनता, समृद्धी महामार्गावर सध्या हायवे हिप्नॉसिससारख्या गोष्टींची चर्चा होते आहे. त्या गोष्टी दुरुस्त करणं, त्यावर काम करणं ही समाज म्हणून आपल्या सगळ्यांची आणि प्रामुख्याने शासनाची जबाबदारी आहे. ज्यावेळी या समस्यांना दैववादी उत्तरं शोधली जातात त्यामधून समाजाची अधोगती होते आणि ते गंभीर आहे हे सगळ्यांनी समजून घ्यायला हवं.” असंही हमीद दाभोलकर यांनी म्हटलं आहे.

महामृत्यूंजय यंत्र कशासाठी बसवलं?

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालविकास मार्ग दिंडोरी प्रणितच्या वतीने याठिकाणी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आली. सव्वा कोटी महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात आला. अपघातात मृत्यू झालेल्या २५ जणांच्या आत्म्यास शांती मिळावी व भविष्यात अपघात होऊ या उदात्त हेतूने हा विधी करण्यात आल्याचे सांगितले जाते. सुमारे दीडशे महिला-पुरुष भाविक यात सहभागी झाले होते. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत महामृत्यूंजय यंत्र बसवण्यात आले आहे. यामुळे आजूबाजूच्या पाच-दहा किलोमीटरमध्ये अपघात होणार नाही तसेच अपघात झाला तर मृत्यू होणार नाही, असा दावा स्वामी समर्थ सेवा केंद्र समन्वयकांनी केला आहे. या दाव्यावरच डॉ. हमीद दाभोलकर यांनी आक्षेप घेतला आहे आणि कारवाईची मागणी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahamrityunjaya yantra to stop accidents on samriddhi highway dr hamid dabholkar reaction on it scj