पंढरपूर : एकीकडे हरिनाम आणि विठ्ठल भक्तीने पंढरी सजली आहे. सर्व संतांच्या पालख्या पंढरीत विसावल्या आहेत. टाळ-मृदंग, भजन, कीर्तन आणि भाविकांची गर्दी दिसून येत आहे. यंदा सुरुवातीला ऊन त्याच वेळी लांबलेला पाऊस यामुळे भाविकांची संख्या कमी दिसून आली. यंदा दशमीला सायंकाळपर्यंत जवळपास ८ ते ९ लाख भाविक दाखल झाले आहेत. बुधवारी दुपारी विठ्ठलाची दर्शनरांग पत्राशेड १० च्या पुढे गेली होती. शेवटच्या भाविकाला दर्शन घेण्यासाठी साधारणपणे १४ ते १५ तास लागत असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
पावलो पंढरी पार नाही सुखा.. भेटला हा सखा मायबाप.. या अभंगाप्रमाणे भाविकांची विठ्ठल दर्शनाची तृष्णा पूर्ण झाली. यंदा पावसाने ओढ दिल्याने यात्रेवर परिणाम होईल असे वाटत होते. मात्र राज्यात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे पेरणीची कामे सुरू झाली आहेत. परिणामी प्रशासनाने जो अंदाज व्यक्त केला. त्या पेक्षा कमी भाविक दाखल झालेत, असे असले तरी येथील मठ, धर्मशाळ, लॉज, मोकळे पटांगण, जिथे जागा मिळेल तिथे भाविकांच्या राहुटय़ा, तंबू पाहावयास मिळत आहेत. तसेच शहरातील मंदिर परिसर, प्रमुख रस्त्यांवर भाविकांची वरदळ आहे. सर्वत्र भजन, कीर्तन, हरिनामाच्या गजराने नगरी दुमदुमून निघाली आहे.
पालख्या पंढरीत विसावल्या
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उभे रिंगण वाखरी येथे झाले. त्यानंतर संतांच्या पालख्या पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी परंपरेप्रमाणे भाटे यांच्या रथातून पंढरीला आली. पंढरपूरच्या जवळ आल्यावर शितोळे सरदार माउलींच्या पादुका गळय़ात घेऊन आले. आणि ज्या क्षणाची भाविक वाट पाहत होते त्या पंढरी नगरीत पालख्या विसावल्या. जाऊ देवाचिया गावा.. देव देईल विसावा.. या अभंगा प्रमाणे वारकरी पंढरीत विसावला. वैष्णवांच्या मांदियाळीने पंढरी नगरी फुलून गेली आहे.
संतांच्या पादुका आपापल्या मंदिरात विसावल्या आहेत. टाळ-मृदंग आणि ग्यानबा तुकारामच्या जयघोषात पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. आता भाविकांना सावळय़ा विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.