Maharashtra Kesari 2025 : अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. मागील चार दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहे. मात्र, आज (२ फेब्रुवारी) या स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना पार पडत असताना मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाल्यामुळे स्पर्धेला गालबोट लागलं आहे. पैलवान शिवराज राक्षेचा पराभव झाल्याचा निर्णय पंचांनी दिला. मात्र, पैलवान शिवराज राक्षेने पंचांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत पंचाला लाथ मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी अभूतपूर्व गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात उपांत्य फेरीचा कुस्तीचा सामना रंगला होता. मात्र, पैलवान पृथ्वीराज मोहोळकडून शिवराज राक्षे पराभूत झाला. पण पराभूत होताच शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मैदानात काहीवेळ गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद काहीसा निवाळला. पंचांनी दिलेला निर्णय मान्य न झाल्यामुळे शिवराज राक्षेने हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निकालाबाबत बोलताना शिवराज राक्षेने म्हटलं की, “माझी पाठ टेकली नव्हती. त्यामुळे हा निकाल आपल्याला मान्य नाही”, तसेच लाथ मारल्याचे आरोपही शिवराज राक्षे यांनी माध्यमांशी बोलताना फेटाळून लावले. त्यामुळे आता या स्पर्धेच्या निकालाबाबत पंच आणि कुस्ती महासंघ काय निर्णय घेतात? तसेच या वादाबाबत काय भूमिका मांडतात याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.
अजित पवारांसमोरच स्पर्धेत गोंधळ
महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगरमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आज या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा उपांत्य सामना पार पडत होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र, यावेळी पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये सामना रंगला. मात्र, काही वेळातच शिवराज राक्षे पराभूत झाल्याचा निर्णय पंचांनी दिली. त्यामुळे पैलवान शिवराज राक्षे हा संतापल्याचं पहायला मिळालं. तसेच शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारल्याचा आणि पंचांची कॉलर पकल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा गोंधळ सुरु असतानाच त्या ठिकाणी अजित पवार हे देखील उपस्थित होते. हा गोंधळ झाल्यानंतर शिवराज राक्षेने या सामन्याचा रिव्ह्यू घेण्याची मागणी केली. त्यामुळे आता याबाबत पंच काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.