Devendra Fadnavis Cabinet Expansion : देवेंद्र फडणवीस सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज (१५ डिसेंबर) नागपुरात विधानसभासभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडला. यावेळी एकूण ३९ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. १० दिवसांपूर्वी देवेद्र फडणवीस यांनी राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तर, आज ३३ नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची आणि सहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज भाजपाच्या १९, शिवसेनेच्या (शिंदे) ११, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपध घेतली. पुढील दोन दिवसांत या मंत्र्यांमध्ये खातेवाटप होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नव्या मंत्रीमंडळाचं ‘सर्वसमावेशक’ असं वर्णन केलं आहे. या मंत्रीमंडळात तिन्ही पक्षांनी २० नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर, १२ मंत्र्याना डच्चू दिला आहे.
राज्यात याआधी देखील महायुतीचंच सरकार होतं. एकनाथ शिंदे हे त्या सरकारचे प्रमुख (मुख्यमंत्री) होते. त्यांच्या मंत्रीमंडळातील १२ मंत्र्यांना यावेळी फडणवीसांच्या मंत्रीमंडळात स्थान दिलेलं नाही. यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांची नावं देखील आहेत. यात रवींद्र चव्हाण, तानाजी सावंत, दीपक केसरकर, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील अशा मोठ्या नेत्यांचा देखील समावेश आहे.
हे ही वाचा >> फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा? तिन्ही पक्षांकडून सहकार पंढरीला झुकतं माप; साताऱ्यातील चौघांना संधी
या माजी मंत्र्यांना डावललं
क्र. | माजी मंत्र्याचं नाव | पक्ष |
1 | दिलीप वळसे पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) |
2 | छगन भुजबळ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) |
3 | अनिल पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) |
4 | संजय बनसोडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) |
5 | धर्मराव आत्राम | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) |
6 | सुधीर मुनगंटीवार | भारतीय जनता पार्टी |
7 | विजयकुमार गावित | भारतीय जनता पार्टी |
8 | सुरेश खाडे | भारतीय जनता पार्टी |
9 | रवींद्र चव्हाण | भारतीय जनता पार्टी |
10 | तानाजी सावंत | शिवसेना (शिंदे) |
11 | अब्दुल सत्तार | शिवसेना (शिंदे) |
12 | दीपक केसरकर | शिवसेना (शिंदे) |
हे ही वाचतो >> “आम्हाला मध्येच डच्चू मिळू शकतो”, संजय शिरसाटांनी सांगितला एकनाथ शिंदेंनी नवनिर्वाचित मंत्र्यांना दिलेला संदेश
मंत्र्यांना डच्चू देण्याचं कारण काय?
दरम्यान, मंत्र्यांच्या शपथविधीनंतर चहापानाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर नव्या मंत्रीमंडळाची पहिली बैठक देखील पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही वेगवेगळ्या समाजांना, जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं आहे”. यावर त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. अनेक माजी मंत्री या मंत्रिमंडळात दिसत नाहीत. याची काय कारणं आहेत? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “यामागे वेगवेगळी कारण आहेत. मी माझ्या पक्षापुरतं उत्तर देईन. अनेकदा काही मंत्र्यांना पक्षांतर्गत कारणांमुळे मंत्रिमंडळात घेतलं जात नाही. उदाहरणार्थ पक्षाने एखाद्या नेत्याला वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलं असेल तर त्या नेत्याला आम्ही मंत्रिमंडळात घेत नाही. भाजपात कोणाला पक्षात मोठी जबाबदारी द्यायची असेल तर आम्ही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देत नाही. तसेच असेही असू शकतं की एखाद्या नेत्याला त्याच्या कामगिरीमुळे मंत्रिमंडळात स्थान देणं टाळलेलं असू शकतं.