दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. तसंच डेल्टा प्लस विषाणूचा धोकासुद्धा आहे हे सगळे लक्षात घेऊन पुढच्या काळातल्या आरोग्य सुविधांबद्दल आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील या बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ( लेव्हल्स) ठरवल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे.
Maharashtra CM directs Health Dept to make plans to for all districts to tackle the possible third wave of COVID. CM was talking to collectors of Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Satara, Sangli, Kolhapur & Hingoli districts. Health Min Rajesh Tope was also present: CM Secretariat
— ANI (@ANI) June 24, 2021
लेव्हल्सचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. यादृष्टीने आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. वैद्यकीय सुविधांबद्दल मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, विशेषतः दुसऱ्या लाटेत आपण ऑक्सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे. आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध राहील हे पहा. आपल्याला बऱ्याच ठिकाणी फाईल्स रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील त्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा.
हेही वाचा- राज्यात आरोग्य विभागाच्या रुग्णालयात सर्वाधिक करोना रुग्णांवर उपचार!
सातत्याने संसर्ग वाढणाऱ्या सात जिल्ह्याबद्दल बोलताना टास्क फोर्सच्या सदस्यांनी सांगितले की, या सातही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. या विषाणूची लक्षणेही बदलत आहेत. लसीकरणाविषयी नागरिकांच्या मनातील भ्रामक कल्पना व समजुती दूर करुन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. प्रसंगी अधिक कडक निर्बंधही लावावे लागणार आहेत.
हेही वाचा- राज्यात पुन्हा कठोर निर्बंध
याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली तसेच फिरत्या प्रयोगशाळा पुरविण्याची विनंती केली तसेच गावोगावी कोरोनमुक्तीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर ०. १५ इतका कमी झाला आहे. मात्र या सातही जिल्ह्यांचा दर त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट आहे. रत्नागिरीत पहिल्या लाटेत ३०७४ रुग्ण तर दुसऱ्या लाटेत ५६०० रुग्ण, सिंधुदुर्गात पहिल्या लाटेत १३४६ तर सध्या ५५०० , हिंगोलीत पहिल्या लाटेत ६६० तर दुसऱ्या लाटेत ६७५ रुग्ण आढळले असून ही वाढ सावध करणारी आहे असं आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितलं.