Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमत मिळवल्यानंतर आज (९ जून) नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा सायंकाळी पार पडणार आहे. यावेळी त्यांच्याबरोबर ३० नवनिर्वाचित खासदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. यासंबंधीचे वृत्त अनेक वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातीलही काही खासदारांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्र भाजपातील चार, शिंदे गटाचा एक आणि आरपीआय आठवले गटातील एका नेत्याला मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तसेच अजित पवार गटही एक मंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. यासह रालोआचं तिसरं सरकार बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तेलुगू देशम पार्टीला आणि संयुक्त जनता दलाला मोठी खाती दिली जाण्याची शक्यता आहे. जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांच्या पक्षाने थेट नितीन गडकरींकडे असलेलं रस्ते विकास खातं आणि अश्विनी वैश्णव यांच्याकडील रेल्वे खातं मागितल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, महाराष्ट्रातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल यांना मंत्रिपद मिळू शकतं. तर भाजपामधून नारायण राणे, रक्षा खडसे आणि उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासह आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांच्याकडील सामाजिक न्याय राज्यमंत्रिपद कायम राहणार आहे. मंत्रिपदासाठी आतापर्यंत नितीन गडकरी, रक्षा खडसे, पीयुष गोयल यांना पक्षनेतृत्वाने फोन केला आहे. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुलरीधर मोहोळ यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याच्या बातम्या काही वृत्तविन्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच प्रतापराव जाधव यांनादेखील मंत्रिपदासाठी फोन आला आहे. रावेरच्या खासदार रक्षा खडसेंना राज्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं.

दरम्यान, भाजपा पक्षनेतृत्वाच्या फोननंतर रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मला सध्या या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. मी तिसऱ्यांदा खासदार म्हणून संसदेत जात असले तरी मंत्रिपदाची अपेक्षा नव्हती. मी मुळात अशा अपेक्षेने काम केलं नाही. मी पक्षाची एक कार्यकर्ती म्हणून काम करत आहे, तीच माझी सवय आहे आणि पुढेही मी पक्षासाठीच काम करत राहणार आहे. मला वाटतं हे सगळं केवळ आमचे नेते आणि जनतेमुळे शक्य झालं आहे. जनतेने मला तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून संसदेत पाठवलं आहे. त्यामुळे हे सगळं जनतेचे श्रेय आहे.

हेही वाचा >> आज रालोआचा शपथविधी; मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात ३० जणांच्या समावेशाची शक्यता

दरम्यान, केंद्रीय मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, आम्हा सर्वांना असं वाटत होतं की कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय मंत्रिपद घ्यावं आणि आम्ही देखील एकनाथ शिंदे यांना त्याबाबत सुचवलं होतं. परंतु, श्रीकांत शिंदे आम्हाला म्हणाले की त्यांना संघटनेत काम करायचं आहे. एकनाथ शिंदेंचीदेखील तशीच इच्छा आहे. श्रीकांत शिंदे वरिष्ठ खासदार आहेत, त्यांचा लोकसभा सदस्यत्वाचा हा तिसरा कार्यकाळ आहे. तरी देखील एखाद्या सामान्य शिवसैनिकाला केंद्रीय मंत्रिपद मिळावं असं एकनाथ शिंदे यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी मला संधी दिली आहे. मी त्यांचे आभार मानतो

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra 6 mps will get central minsitsry in 3rds narendra modi govt oath taking ceremony updates asc
Show comments