महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत सीमावाद पेटला असून बेळगाव येथील हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात कर्नाटक सरकार विरोधात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील नवले ब्रीज येथे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले असून त्यांनी कर्नाटक सरकाराच्या गाड्या अडवून त्यावर काळे फासून, त्यावर जय महाराष्ट्र, जय मनसे लिहून निषेध नोंदविला.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत सीमावाद पेटला असून बेळगाव येथील हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असून राज्यातील अनेक संघटना कर्नाटक सरकार विरोधात आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.त्याच दरम्यान आज दुपारच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट एस.टी स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या लक्ष्मी नारायण टॉकीज जवळील सना पार्क येथे उभ्या असलेल्या कर्नाटकच्या बसलेला ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले.तर भगव्या अक्षरात जय महाराष्ट्र लिहून निषेध नोंदविण्यात आला.या आंदोलन प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सात जणांना अटक करण्यात आली होती.ती घटना थांबत नाही. तोवर मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली पुणे सातारा महामार्गवरील स्वामी नारायण मंदिराजवळ कर्नाटकच्या बस अडवून, त्यावर काळे फासण्यात आले असून जय महाराष्ट्र, जय मनसे असे लिहून निषेध नोंदविण्यात आला.या आंदोलन प्रकरणी मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, विक्रांत अमराळे,युवराज लांडगे, सचिन काटकर यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले की,आपल्या राज्यातील असंख्य वाहन कर्नाटकमध्ये अडवून ठेवण्यात आली आहेत. तसेच आपली काही गाव कर्नाटक राज्य मागत आहे. या दोन्ही घटनांचा निषेध म्हणून आम्ही कर्नाटकच्या गाड्या अडवून निषेध नोंदवित आहोत, अजून ही कर्नाटक राज्य सरकारची अशीच भूमिका कायम राहिल्यास आम्ही यापुढे राज्यात कर्नाटक राज्याची एकही गाडी चालू देणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.