वाई: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ‘सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ हेरंब कुलकर्णी यांना, तर ‘अंनिस कार्यकर्ता जीवनगौरव’ पुरस्कार प्रभाकर नानावटी यांना जाहीर करण्यात येत आहे, तसेच श्रीपाल ललवाणी (पुणे) विनायक माळी (मंगळवेढा),उषा शहा (सोलापूर), मतीन भोसले (अमरावती) यांचाही विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती अंनिस मार्फत डॉ हमीद दाभोलकर प्रशांत पोतदार, वंदना माने डॉ दीपक माने, प्रमिदिनी मंडपे, सुकुमार मंडपे हौसेराव धुमाळ ,भगवान रणदिवे यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे साताऱ्यात दिली. सन्मानपत्र व १५ हजार रुपये रोख असे दोन्ही पुरस्काराचे स्वरूप आहे.
हेही वाचा >>> सातारा:राज्यातील शिवसेना आमदार अपात्रतेचा प्रश्नच नाही-महेश शिंदे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सामाजिक चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या विविध कार्यकर्त्यांना, मान्यवरांना अंनिसचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. ‘सुधाकर आठल्ये ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार’ पुणे अंनिसचे क्रियाशील कार्यकर्ते श्रीपाल ललवाणी यांना प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र व १० हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
हेही वाचा >>> वैद्यनाथ साखर कारखाना १९ कोटी रूपये GST नोटीस प्रकरण, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…
सावित्रीमाई फुले महिला प्रेरणा पुरस्कार’ सोलापूर ‘अंनिस’च्या ज्येष्ठ कार्यकर्त्या उषा शहा यांना देण्यात येत आहे. सन्मानपत्र व १० हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार महात्मा फुले पतसंस्था माळीनगर, जि. सोलापूर यांच्याकडून पुरस्कृत केला जातो. भटक्या-विमुक्त जाती- जमातीतील अघोरी प्रथा, चाली-रीती याविषयी प्रबोधनकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा “प्रबोधन पुरस्कार” देऊन सन्मान केला जातो. यावर्षी हा पुरस्कार मंगळूर चव्हाळा (जि. अमरावती) येथे फासेपारधी मुलांसाठी ‘प्रश्नचिन्ह’ नावाची शाळा चालवणारे मतीन भोसले यांना देण्यात येत आहे.सुधाकर आठल्ये युवा कार्यकर्ता पुरस्कार’ मंगळवेढा अंनिसचे सक्रिय कार्यकर्ते विनायक माळी यांना प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र व १० हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या सर्व पुरस्काराचे वितरण दि.१ ऑक्टोबर रोजी नांदेड येथे होणाऱ्या अंनिसच्या राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नंदकुमार मुलमुले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.