सोलापूर : शोषणाला विरोध हा अंनिस आणि कामगार चळवळी मधला समान धागा आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी जादुटोणा विरोधी कायदा मंजूर होण्यासाठी आयुष्य पणाला लावले.त्यांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल लागायला अकरा वर्षे लागतात आणि अर्धाच न्याय मिळतो ही लोकशाही मधली शोकांतिका आहे, असे मत माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापुरात हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात शालिनीताई ओक विचारपीठावर अंनिसची राज्य कार्यकारिणीच्या या दोन दिवसीय बैठकीसाठी राज्यातील १९ जिल्ह्यांतून २०० कार्यकर्ते उपस्थित आहेत. या बैठकीची औपचारिक सुरूवात अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्राच्या ‘ डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला निकाल विशेषांका ‘ च्या प्रकाशनाने झाली.

हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी मला मंत्रीपदाबाबत विचारलं, तर…”; श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका!

कॉ. आडम म्हणाले, मनुस्मृतीची पुनर्स्थापना करण्याची इच्छा असलेल्या लोकांची सध्या चलती आहे. अशा कालखंडात लोकांना शहाणे करण्याचे काम आपल्याला आधिक चिकाटीने करावे राहावे लागेल. ज्या देशात ज्योतिषांच्या सांगण्यावरून मंत्रिमंडळाचा शपथविधी पुढे ढकलला जातो आणि निवडणुकीत उमेदवारी अर्जदेखील मुहूर्त बघून भरले जातात, अशा समाजात आपली लढाई चालू आहे. हजारो वर्षे शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरुध्द आपली लढाई आहे, पण जशा प्रकारे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुजाण मतदारांनी राज्य घटना बदलू इच्छिणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकवला, त्याच प्रेरणेने आपल्याला काम करावे लागणार आहे,असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…आमदार प्रकाश सोळंकेंचा मोठा दावा; म्हणाले, “रोहित पवार स्वत: भाजपामध्ये…”

दिवसभरात कार्यशाळेत राज्य अहवाल आणि जिल्हा अहवाल सादर करण्यात आला. डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला निकाल्याच्या अनुषंगाने चर्चा होऊन ज्या आरोपींची सुटका झाली आहे, त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याचे ठरले. प्रारंभी उषा शहा यांनी स्वागत तर मुक्ता दाभोलकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अस्मिता बालगावकर यांनी तर प्रा. अशोक कदम यांनी आभार मानले. यावेळी अंनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, फारुख गवंडी, डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, निळकंठ जिरगे, नंदिनी जाधव, मुंजाजी कांबळे, सम्राट हटकर, विनोद वायंगणकर, प्रकाश घादगिने, गणेश चिंचोले उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra andhashraddha nirmoolan samiti s state executive meeting at solapur psg
Show comments