राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी अध्यक्ष चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे सहकारी आनंद सुब्रमण्यम यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत कारवाई केली जावी आणि त्यांनी सेबीला दिलेला जबाब गृहीत धरून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अंनिसने याबाबत निवेदन देत या प्रकरणाची तपासणी करणाऱ्या सीबीआयला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे कारवाीची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंनिसने म्हटलं, “राष्ट्रीय शेअर बाजारासारख्या देशाच्या आर्थिक दृष्टीने अत्यंत महत्वाच्या संस्थेमधील सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीने आपले दैनंदिन काम पाहण्यासाठी अध्यात्मिक गुरूच्या नावाखाली भोंदू बाबाचा सल्ला घेणे ही शरमेची बाब आहे. महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यान्वये हा गुन्हा आहे. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार, ‘दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्या आधारे लोकांना फसवणे हा गुन्हा आहे.'”

“चित्रा रामकृष्णांकडून अतींद्रिय शक्तींचा दावा”

“को-लोकेशन घोटाळा प्रकरणी चित्र रामकृष्ण यांनी सेबीला दिलेल्या जबाबात आपण आनंद सुब्रम्हण्यम यांची नेमणूक आणि इतर बाबींमध्ये आपल्या हिमालयातील अध्यात्मिक गुरूचा सल्ला घेत होतो,” असं म्हटलं. तसेच या गुरूचा ठावठिकाण विचारला असता त्यांना मानवी देह नाही असे अतींद्रिय शक्तींचा दावा करणारे उत्तर चित्रा रामकृष्ण यांनी दिल्याचाही मुद्दा अंनिसने नमूद केला.

“धार्मिक भावनांचा गैरफायदा घेऊन लोकांची फसवणूक”

अंनिसने आपल्या निवेदनात पुढे म्हटले, “प्रत्यक्षात शरीराच्या शिवाय माणसाचे अस्तित्व शक्य नाही, असे असताना लोकांच्या मनात असलेल्या धार्मिक भावनांचा गैरफायदा घेऊन अतींद्रिय शक्तीच्या नावावर शेअर बाजारा संबंधी निर्णय घेण्यात आले. यातून चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे सहकारी आनंद सुब्रम्हण्यम यांनी लोकांची फसवणूक केली आहे. शेअर बाजारातील घोटाळा बाहेर आल्यावर सेबीने केलेल्या चौकशीमध्ये प्रत्यक्षात ही माहिती समोर आली आहे.”

“सीबीआयने भोंदूगिरीच्या अनुषंगाने तातडीने चौकशी करावी”

“या अतींद्रिय शक्तीचा दावा असलेल्या बाबाकडून आलेल्या इमेल देखील आहेत. सेबीच्या अहवालात या गोष्टी स्पष्ट नमूद केल्या आहेत. सेबीने केवळ आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेच्या दृष्टीने चौकशी केली आहे. त्यामुळे त्यामधील भोंदूगिरीच्या दाव्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयने या भोंदूगिरीच्या अनुषंगाने तातडीने चौकशी करावी,” अशी मागणी महाराष्ट्र अंनिस मार्फत करण्यात आली.

“या प्रकरणात महाराष्ट्रातील जादूटोणा विरोधी कायदा लागू”

“राष्ट्रीय शेअर बाजाराचे मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे असल्यामुळे महाराष्ट्रात लागू असलेला जादूटोणा विरोधी कायदा या प्रकरणात लागू होतो. हे सीबीआय तसेच मुंबई पोलीस आयुक्त यांना देखील तक्रार अर्जाद्वारे कळवण्यात आले आहे,” असंही अंनिसने नमूद केले.

“सुशिक्षित आणि उच्च पदस्थ लोक देखील भोंदुगिरीवर विश्वास ठेवतात”

अंनिसने सांगितलं, “अतींद्रिय शक्तीसारख्या कोणताही वैज्ञानिक आधार नसलेल्या गोष्टींवर केवळ अशिक्षित लोक विश्वास ठेवतात असे नसून सुशिक्षित आणि उच्च पदस्थ लोक देखील अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात हे वास्तव या निमित्ताने पुढे आले आहे. आपण आपल्या खासगी आयुष्यात कशावर विश्वास ठेवावा हे प्रत्येकाचा प्रश्न आहे, पण देशाच्या दृष्टीने महत्वाच्या पदावरील व्यक्तीने महत्वाचे कार्यालयीन निर्णय हे भोंदू बाबांच्या सल्ल्याने घेणे किंवा जनतेच्या धर्मभावनांचा फायदा उठवण्यासाठी एखाद्या बाबांच्या नावाआड आपले कृष्णकृत्य झाकण्याचा प्रयत्न करणे हे जनतेची फसवणूक आहे.”

हेही वाचा : “कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव” पुण्यात भोंदू बाबाची विकृत मागणी

“ही फसवणूक लोकांसमोर यावी यासाठी महाराष्ट्र अंनिस या तक्रारीचा पाठपुरावा करणार आहे. अत्यंत उच्च शिक्षित आणि उच्च पदस्थ लोक देखील अशा भोंदूगिरीला बळी पडतात किंवा त्यामागे लपतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस येणाऱ्या काळात सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा या विषयी प्रबोधन मोहीम राबवणार आहे,” असंही अंनिसने नमूद केलं.