महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यामध्ये काही धर्मांध शक्तींकडून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला ९ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा निषेध करून सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकारला जिल्हाधिकाऱ्यां मार्फत निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे, “डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला विरोध करण्यासाठी, प्रतिगामी विचारांच्या संघटित मारेकऱ्यांकडून त्यांचा खून करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पश्चात देखील त्यांच्या निर्भीड आणि विवेकी कार्यकर्त्यांनी त्यांचे कार्य जोमाने पुढे सुरू ठेवले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंताचे देखील खून केले गेले. या चारही खुनांतील आरोपींचा परस्परसंबंध देखील तपासातून पुढे येत आहे.”

“नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. या चारही खुनांबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तीव्र वेदना, खदखद आहे. आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आपल्याव्दारे केंद्र व राज्य सरकारकडे खालील मागण्या करीत आहोत, त्या आपण त्वरित सरकारकडे पोहोचवाव्यात,” अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली.

अंनिसच्या शिष्टमंडळाने शासनाकडे केलेल्या प्रमुख तीन मागण्या

१. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनामागच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा
२. या खुनामागच्या धर्मांध संघटनेवर कठोर कारवाई करावी
३. हा खून खटला जलद गतीने चालवून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी

हेही वाचा : बलगवडे गावचा विधवा प्रथेविरुद्ध ठराव, सांगलीतील पहिली, तर राज्यातील चौथी ग्रामपंचायत

हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनी स्विकारले, आपल्या मागण्या शासना पर्यंत नक्की पोहचवू असे त्यांनी यावेळी सांगितले. निवेदन देताना यावेळी अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, डॉ. सविता अक्कोळे, स्वाती वंजाळे, धनश्री साळुंखे, सर्जेराव पाटील, शाहिन शेख, सुहास यरोडकर, संजय गलगले इ. उपस्थित होते.

Story img Loader