महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने आज इस्लामपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. सहा तालुक्यातून सुमारे २५० कार्यकर्ते या शिबिरासाठी उपस्थित होते. या शिबिराचे उद्घाटन वडाच्या रोपट्याला पाणी घालून डॉ. हमीद दाभोलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी अंनिसच्या राज्यअध्यक्ष सरोज पाटील (माई) यांची प्रमुख उपस्थिती होती.
अंनिसचे राज्य कार्यकारी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘अंनिस समजून घेताना’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ‘अंनिस कोणत्याही देवा धर्माला विरोध करत नाही. तर देवा धर्माच्या नावाखाली जे लोकांचे मानसिक, आर्थिक शोषण करतात त्यांना अंनिस विरोध करते. भारतातील बुद्ध, महावीर, वारकरी संत आणि समाजसुधारकांची धर्म चिकित्सेची परंपरा अंनिस पुढे चालवत आहे.”
“कर्मकांडकेंद्री धर्म मानवकेंद्री करण्याचा प्रयत्न अंनिस करते”
“कर्मकांडकेंद्री धर्म मानवकेंद्री करण्याचा प्रयत्न अंनिस करते. आजही समाजामध्ये नरबळी, करणी, भानामतीचे अघोरी प्रकार सुरू असल्याने या समाजात अंनिस चळवळीची नितांत गरज आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. एन. डी. पाटील यांच्या नंतर सरोज पाटील (माई) यांच्या अध्यक्षतेखाली अंनिसचे काम महाराष्ट्रभर वाढते आहे. या कामात आपण सहभागी व्हावे,” असं आवाहन हमीद दाभोलकर यांनी केलं.
“आपल्या देशाला पुन्हा मध्ययुगात नेण्याचा प्रयत्न”
अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा. प. रा. आर्डे यांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयाची मांडणी केली. आर्डे म्हणाले, “युरोपियन खंडात नवसुधारणा, विज्ञानाचा प्रचार झाल्यानंतर वैज्ञानिक जाणिवा लोकांच्या मनात विकसित झाल्या. निर्भिडपणे प्रश्न विचारणे, चिकित्सा करणे यातून वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो. या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे युरोपीयन राष्ट्रांनी आपली प्रगती केली आहे. गॅलिलिओ ते डॉ. नरेंद्र दाभोलकर असा मोठा वारसा या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आहे. भारतात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मानवतावादी वैज्ञानिक दृष्टिकोन यांची कल्पना मांडून राष्ट्राची उभारणी करण्याचे ठरवले, पण आजचे राज्यकर्ते हे नेहरूंनाच चूक ठरवत आहेत. हे आपल्या देशाला पुन्हा मध्ययुगात नेण्यासारखे आहे.”
“सध्या देशात धार्मिक कट्टरता वाढविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या धार्मिक कट्टरतेमुळे आपली शेजारी राष्ट्रे रसातळाला गेली आहेत हे आपण पहात आहोत. तेव्हा भारताने वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारला तरच देशाची प्रगती होवू शकेल, त्यासाठी अंनिस युवकांना हा दृष्टिकोन देण्यासाठी अशी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करते,’ अशी माहिती आर्डे यांनी दिली.
अंनिस शाखा कशी चालते?
अंनिस शाखा कशी चालते? या विषयावर बोलताना अंनिसचे राज्य कार्यकारी सदस्य फारुख गवंडी यांनी अंनिसची चतु:सुत्री विशद केली. ते म्हणाले, ‘अंनिसचे काम करताना डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमी म्हणायचे की, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या कामात क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे. अंनिसचे हे काम कोणत्याही देशी विदेशी वा सरकारी फंडिंग न घेता लोकसहभागातून चालते.’
‘अंनिसमध्ये काम करताना कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की असावी. आज चुकीच्या विचारांची पकड समाजावर आहे, ती पकड सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी चिकाटीने प्रयत्न करावेत. चमत्कार सादरीकरण हा लोकांच्यामध्ये जाण्याचा एक प्रमुख मार्ग आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी चमत्कार सादरीकरण सफाईदार पणे केले पाहिजे,’ असं गवंडी यांनी नमूद केलं.
अंनिसच्या राज्य अध्यक्षा सरोज पाटील म्हणाल्या की, “डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि एन. डी. पाटील सर यांनी सुरू केलेल्या या अंनिस चळवळीचे कार्य आपण सर्वांनी जोमाने पुढे नेऊया. या कामासाठी जी मदत लागेल ती करायला मी तयार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक जाणिवा निर्माण करण्यासाठी अंनिसने प्रयत्न करावेत.”
ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य विश्वास सायनाकर म्हणाले की, ‘एन. डी. पाटील साहेबांनी या कॉलेजची पायाभरणी करताना साधा नारळही कधी फोडला नाही. ते म्हणायचे की नारळ फोडून माझी इमारत आपोआप उभी राहिल का? बांधकाम मजूर, गवंडी, प्लंबर , इंजिनिअर यांचेमुळे इमारत उभी राहते. मग कशाला करायचे असले कर्मकांड. कृतीतून अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या एन. डी. सरांचा हा वारसा सरोज पाटील (माई) पुढे चालवत आहेत. बिकट वाट वहिवाट करण्याची एन. डी साहेबांची परंपरा सरोज पाटील (माई) या अंनिसच्या अध्यक्ष पदातून पुढे नेतील असा मला विश्वास आहे. अंनिसचे राज्य अध्यक्षपद स्वीकारलेबद्दल मी सरोजमाईंचे अभिनंदन करतो.’
या प्रसंगी अंनिसच्या राज्यअध्यक्षपदी निवड झालेबद्दल इस्लामपूर मधील १६ सामाजिक संघटनांनी सरोज पाटील (माई) यांचा सत्कार केला. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या मे २०२२ अंकाचे प्रकाशन सरोज पाटील व इतर मान्यवरांचे हस्ते झाले. यावेळी अंनिसचे ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’चे १३० वर्गणीदार केल्याबद्दल डॉ. एस. के. माने यांचा सत्कार डॉ. हमीद दाभोलकर यांनी केला.
प्रास्ताविक राहुल थोरात, सूत्रसंचालन डॉ. अलका पाटील तर आभार डॉ. एस. के. माने यांनी मानले. या शिबिरासाठी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, संस्थेचे अध्यक्ष एन आर पाटील, उपाध्यक्ष सुनील पाटील, बी. ए. पाटील, दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील, डॉ.संजय निटवे, इब्राहिम नदाफ, डॉ.निलम शहा उपस्थित होते.
हेही वाचा : “शेअरबाजारातील भोंदूगिरीवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा”, अंनिसची मागणी
शिबिराचे यशस्वी संयोजन प्रा. सचिन गरुड, डॉ. राजेश दांडगे, डॉ. संतोष खडसे, दिपक कोठावळे, प्रा.सी. जे. भारसकळे, शशिकांत बामणे, जगन्नाथ नांगरे, सीमा परदेशी, स्मिता पाटील, प्रा. पी. एच. पाटील यांनी केले.